भीसी प्रकरणातील मुख्य आरोपीला झाली अटक

गडचिरोली : भिसी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोनू जमशेद ठाकूर याला गडचिरोली पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर जिल्ह्यातील बादशहापूर येथून अटक करून 3 सप्टेंबरला गडचिरोली येथे आणले आहे.

भिसीच्या माध्यमातून सोनू ठाकूर याने गडचिरोली शहरातील नागरिकांची फसवणूक करून तो पसार झाला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्याविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम ४०६, ४२०, ३४ सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम सन १९९९ नुसार पोलीस ठाणे गडचिरोली १४ जून २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोनू जमशेद ठाकूर, त्याचा भाऊ, पत्नी, तसेच सहकारी छगन शंकर जेंगठे हे फरार झाले होते. सोनू ठाकूर हा अटकेपासून वाचण्याकरिता ठिकाणे बदलून राहत असल्याबाबत माहिती पोलिसांना प्राप्त झाली.

उपविभागीय पोलीस अधिकार प्रणिल गिल्डा हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक अमोल टेकाळे, नाईक पोलीस शिपाई कलाम पठाण, रजनीकांत पिल्लेवान, पोलीस शिपाई संजय कांबळे यांचे पथक उत्तर प्रदेश राज्यात गेले. ठाकूर याला उत्तर प्रदेशातील बादशहापूर येथून ताब्यात घेण्यात आले. 3 सप्टेंबरला त्याला गडचिरोली पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post