जि.प.उच्च प्राथमिक शाळा थुगाव निपाणी चे दुहेरी यश

nagpur
शाळेने शोधले एकापेक्षा एक वैज्ञानिक::

राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता.23

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थुगाव निपाणी ही शाळा नरखेड तालुक्यातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी ही मुले जपानी भाषेत संवाद साधताना दिसतात तर कधी जर्मन दूतावसातर्फे आयोजित ग्लोबल महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जर्मन भाषेचे धडे घेताना दिसतात. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थी व्यावसायिक कौशल्य विकासातही मागे नाही. त्या विष्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊचे पैसे गोळा करण्यासाठी स्वतःचीच बँक सुरू केली आहे. अश्या बहुआयामी विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सत्रात भविष्यातील वैज्ञानिक घडण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आणि नुसते उचळलेच नाही तर ते जिल्ह्याच्या नकाशावर भक्कमपणे रोवले. एकीकडे या वर्षी झालेल्या 49 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत शाळेतील 8वीतील विद्यार्थी यश जनार्धन चौधरी याने साकारलेल्या *अपघातरहीत रेल्वे ट्रॅक* च्या प्रतिकृतीला जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळाला आणि त्याला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. तर दुसरीकडे जिल्हास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी *लसीकरणाची कथा* या विषयावर नाट्य सादर करून द्वितीय पुरस्कार प्राप्त केला, आता या विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबर ला विभाग स्तरावर याचे सादरीकरण करायची संधी आहे. या नाटिकेत साची देवासे, केतन मोहोड वर्ग दुसरा, जानवी पुरी, पार्थ हिवसे, आरुषी टेकाडे वर्ग सातवा तर नूतन गोरे, सलोनी चौधरी व यश चौधरी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नरखेड पंचायत समितीच्या सभापती निलिमाताई रेवतकर, गटविकास अधिकारी निलेश वानखेडे,गटशिक्षणाधिकारी विशालसिंह गौर, शिक्षण विस्तार अधिकारी जनबंधू यांच्यासह सरपंच बापूराव बडोदेकर, उपसरपंच प्रवीण चोपडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद चौधरी, उपाध्यक्ष अनिता गोरे आणि सर्व समिती सदस्य तथा गावकऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले आणि विभाग तथा राज्यस्तरावर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

Previous Post Next Post