आरएफओंनीच दिली चक्क चाकूने भोसकण्याची वनरक्षकाला धमकी



वनपालांच्या कार्यालयातच अर्वाच्च शिविगाळ वनविभागाच्या वर्तुळात खळबळ


चंद्रपूर :- वरोरा येथील  वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या एका वनरक्षकाला इतर कर्मचाऱ्यांसमोर अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून चक्क चाकूने भोसकण्याची धमकी दिल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकाराने मानसिक धक्का बसलेल्या वनरक्षकाने वनमंत्री, मुख्य वनसंरक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड यांच्याकडून कर्मचाऱ्यांना सुडाच्या वागणूक दिली जात असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. वरोरा तालुक्यातील रामपूर नियतक्षेत्राचे वनरक्षक संदीप दादाजी वाटेकर यांच्याबाबतही असाच प्रकार घडला असून, आपल्या कुटूंबीयांच्या जीवितास काही धोका झाल्यास आरएफओ राठोड हेच जबाबदार राहणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पाच दिवसांपूर्वी टेमुर्डा येथील क्षेत्र सहाय्यकांच्या कार्यालयातच हा प्रकार घडला असून, यावेळी वरोरा वनपरिक्षेत्रातील इतर अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. एका वनपालाने आरएफओ राठोड यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही न जुमानता एकदम खालच्या स्तरावर वनरक्षकाला शिवीगाळ करून चाकूहल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे वनविभागातील एखाद्या आरएफओकडून असे कृत्य होत असेल तर कर्मचाऱ्यांनी कसे काम करायचे, असा सवाल उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेमार्फतही यापूर्वी भावनेने राठोड यांच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड हे यापूर्वी सावली वनपरिक्षेत्र व बफर क्षेत्रात कार्यरत होते. त्या ठिकाणीसुद्धा ते वादग्रस्त ठरले होते. त्यांनी छळ केल्यामुळे वनपाल कोलाम यांचा बळीसुद्धा गेला आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त राहिली असून, दबाव टाकून नियमबाह्य कामे केली असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post