अखेर त्या तरुणाचा मृतदेह आढळला

गडचिरोली : पोटेगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत खरडगुडा येथील तरुण शेतकरी महेश लेकामी (२२ वर्ष) याचा मृतदेह पोर नाल्याच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला. गेल्या आठ दिवसांपासून त्याचा शोध लागलेला नव्हता. जनावरे चारून घराकडे परत येताना नाल्याच्या पुरात तो वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, महेश हा १२ सप्टेंबर रोजी आपली जनावरे घेऊन शेताकडे चारण्यासाठी गेला होता. यावेळी परत येताना पोर नाल्याचा
प्रवाह वाढला. त्या पुराच्या पाण्यातून गावाकडे येताना एक दोन जनावरे वाहून जाऊ लागल्याने तो त्या दिशेने गेला आणि पाण्यात गायब झाला होता.

आता पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने खाली फसलेला त्याचा मृतदेह दिसला.

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचठिकाणी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post