पंतप्रधान मोदींना ढोंगी, बहुरूपी म्हटल्याने भाजप नेते संतापले…


पाटणा – जेडीयु पक्षाचे बिहार शाखेचे अध्यक्ष लल्लन सिंह यांनी ढोंगी, बहुरूपी असे शब्द वापरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती, त्यामुळे भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी लल्लन सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती, पण ती लल्लन सिंह यांनी साफ धुडकावून लावली असून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

राजद पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही लल्लनसिंह यांच्या टीकेचे समर्थन केले आहे. त्यांनी अत्यंत योग्यच केले आहे असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. आपण ईबीसी व ओबीसी समाजाचे आहोत असे सांगत मोदींनी सन 2014 मध्ये प्रचार केला होता. पण गुजरातमध्ये ईबीसी ही वर्गवारीच नाही आणि मोदी ओबीसीही नाहीत. ते तेथे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसी यादीत समाविष्ट केली आहे. ते अत्यंत ढोंगी आणि बहुरूपी नेते आहेत अशी टीका लल्लनसिंह यांनी केली होती.

सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध करताना भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, त्यांनी पंतप्रधानांविरोधात जे काही वक्तव्य केले ते अत्यंत आक्षेपार्ह आणि असंसदीय आहे. लल्लनसिंह यांनी हे विसरू नये की 2019 ची लोकसभा निवडणूक ते पंतप्रधान मोदींमुळे जिंकले आहे. भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनीही लल्लनसिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करीत ते गरीब विरोधी आहेत असा दावा केला आहे.

उपेक्षित घटकातील नरेंद्र मोदींसारखा माणूस भारताचा पंतप्रधान झाला हे सत्य त्यांना पचनी पडू शकत नाही,असे राय म्हणाले. बहुरूपी आणि ढोंगी हे असंसदीय शब्द नाहीत असा बचाव करीत लल्लन सिंह यांनी आपल्या वक्तव्याचे जोरदार समर्थनही केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post