धम्म चक्र प्रवर्तन दिन.... विशेष

धम्म चक्र प्रवर्तन दिन:-
जगांतला कोणताही धर्म वाईट नाही . मानवाचे कल्याण करणे हा सर्व धर्माच्या विचार प्रणालीचा केंद्र बिंदू आहे.परंतु धर्ममार्तंडानी आपल्या धर्माला अधिक अनुयायी मिळविण्याच्या दृष्टीने आपापल्या तऱ्हेने धर्माचा प्रचार व प्रसार केलेला आढळून येतो.
आज समाजात अनेक दुष्ट प्रवृती डोके वर काढत आहेत . मानव स्वार्थी मत्सरी व क्रोधी बनत आहे . आपल्या स्वार्था करिता तो कोणतेही भयंकर दुष्ट कृत्य करण्यास मागे पुढे पहाणार नाही . त्यामुळेच आजही आखाती युद्धासारखे युद्ध होऊन मोठा मानव संहार होतो . तसेच नानाप्रकारच्या अनिष्ट रुढी , कर्मकांड , अधश्रद्धा यांच्या पकडीतून मानव अद्यापही मुक्त झालेला नाही .. मानवी मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत . जन्मतः कोणताही मानव वाईट नसतो . आजूबाजूची परिस्थिती , त्याच्या वर झालेले कौटुंबिक , सामाजिक व धार्मिक संस्कार त्याला घडवितात . मनुष्याने मनुष्याशी कसे वागावे यांचे योग्य बंधन घालून देण्याचे काम धर्म करीत असल्यामुळे आज परस्परांत प्रेम , सद्भाव , सुख व शांती निर्माण करुन जगा व जगू द्या हे शिकविणाऱ्या मानवतावादी धर्माची आज जगाला फार आवश्यकता आहे .
या संदर्भात डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . " धर्माचा भावनात्मकतेशी व कायद्याचा बुद्धीशी संबंध पोहचतो . जीवनांत भावनात्मकतेला फार मोठे स्थान आहे . म्हणूनच मानवी जीवनावर नियंत्रण ठेवण्या साठी धर्माची आवश्यकता आहे . धर्माचे बंधन नसेल तर जगणे असह्य होईल . कोणत्या तरी धर्माच्या तत्वज्ञानाचे माणसाच्या मनावर दडपण असले पाहिजे ." नीतिनियमाच्या कल्पना ह्या परिस्थिती सापेक्ष असतात काळाच्या ओघांत परिस्थिती सतत बदलत असते . समाजामध्ये सतत स्थित्यतरे घडत असतात . नवनवीन वैज्ञानिक शोध लागत असतात . त्यामुळे जुन्या कल्पना कालबाह्य ठरत असतात . धर्म जर गतौ-शील नसेल , कालौंधा बरोबर वाहाणारा नसेल , जुन्याच विचाराना व तत्वांना चिटकून राहणारा असेल तर त्याला सांचलेल्या डबक्याची अवकळा प्राप्त होऊन त्याचा नाश होण्याची शक्यता असते . मानवाचा सर्वांगीण विकास है उदिष्ट समोर ठेऊन भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली . त्याकरिता त्यांनी स्वातंत्र्य , समता , बंधुत्व तसेच प्रज्ञा , शील , करुणा यांचा उद्घोष केला . जीवन जरी क्षणभंगर असले तरी ते यशस्वीपणे जगण्याकरिता विचार व आचार शुद्ध ठेवले पाहिजेत ही गौतम बुद्धांची धारणा होती . म्हणून मानवाला चारित्र संपन्न करण्यासाठी त्यांनी आपल्या धर्मात नैतिकतेला महत्वाचे स्थान दिले आहे . उच्च नीच जातीभेद न मानता आपल्या धर्मामध्ये शूद्र अतिशूद्र तसेच स्त्रियांनाही या धर्मात प्रवेश दिला . भगवान गौतम बुद्धाचा पिड अस्सल बुद्धी प्रामाण्यवादी होता. त्यांनी आपले विचार व तत्वज्ञान लोकांबर जबरदस्तिने लादलेले नाही , त्यांनी आपल्या अनुयायाना स्पष्टपणे सांगितले , " तुम्ही कोणतीही बाब प्रथम आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा . ती तुमच्या बुद्धीला पटली तरच तिचा स्वीकार करा .अंधश्रद्धेच्या  पोटी अथवा विभुती पूजेच्या आहारी जाऊन कोणतीही बाब आंधळेपणाने स्वीकारू नका. माझ्या धर्माचे विचार व तत्वज्ञान तुम्हाला पटत असेल तरच त्याचा स्वीकार करा . तुम्हाला त्यामध्ये आवश्यक्तेनुसार बदल करण्याचाही अधिकार आहे . लोकशाहीला प्रेरक व पोषक असे तत्वज्ञानात्मक अधिष्ठान बौद्ध धर्मामध्ये आहे बौद्ध धर्माची तत्वे ओजस्वो व कल्याणकारी आहेत . म्हणूनच त्याचा प्रसार केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही झपाट्याने व मोठ्या प्रमाणात झाला , बौद्ध धर्म हा मानवतेला पोषक असल्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या कल्याणाकरिता दि . १४ ऑक्टोबर १ ९ ५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा २२ प्रतिज्ञा सामील करुन घेऊन भारतात या धर्माचे पुनरुज्जीवन केले. तर ईतर देश्यात त्या त्या परिस्थिती नुसार बौद्ध धम्माची दिक्षा घेतली जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना उपदेश केला आहे की , "माणसाकरिता धर्म आहे धर्माकरिता माणूस नाही , माणसूकी , समता , स्वातंत्र्य , बंधुत्व , संघटन सामर्थ्य, सुखाचा संसार व उन्नत जीवन यासाठी बौद्ध धर्मा नुसार आचरण करा . म्हणूनच बौद्ध धर्मानुसार विचार व आचार करुन त्याचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येक बौद्ध बांधवाची आहे . "
धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ऍड. विश्वनाथ तायडे कल्याण
जयभीम नमो बुद्धाय.

Post a Comment

Previous Post Next Post