देशात लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही, सामनामधून भाजपाला फटकारले


मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीत सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांचा जोरदार प्रचार सुरू होता मात्र स्थानिक नागरिकांचा कल हा उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचे दिसून येत असल्याने भाजपकडून उमेदवारी मागे घेण्यात आली आहे . आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आलेला आहे .देशात लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही दिसत आहे असा देखील आरोप आजच्या सामनाच्या मुखपत्रात करण्यात आलेला आहे .

काय आहे आजचा सामनाचा अग्रलेख ?
हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळीने जी उदारमतवादी जीवनमूल्ये प्रमाण मानली व ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य मिळवले, त्यावरच आघात करणारी शक्ती इंदिरा गांधींच्या रूपाने प्रबळ झाल्यावर जयप्रकाश त्या शक्तीविरुद्ध उभे राहिले आणि म्हणून एकाधिकारशाहीविरोधी लढय़ास नैतिक पातळी प्राप्त झाली. आज इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरू आहे. जयप्रकाश नारायण आता असते तर त्यांनी आणखी एका स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असता.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांची विचारधारा व विचारवारसा यावरून देशात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त झाले अमित शहा यांच्या एका वक्तव्याचे. गृहमंत्री अमित शहा यांनी 11 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सारण जिल्हय़ातील लोलटोला सीताबदियारा या गावी भेट दिली. ‘जेपीं’च्या 120 व्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिमेचे अनावरण केले. त्या सोहळ्यात गृहमंत्र्यांनी नितीश कुमार, लालू यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘जयप्रकाश नारायण यांच्या अनुयायांनी सत्तेसाठी आपल्या विचारांचे बलिदान दिले आणि आता ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.’ अमित शहा यांचा हा हल्ला सरळ सरळ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर होता.

नितीश कुमारांनीही मग त्यावर सांगितले की, ‘अमित शहांचे विधान दखलपात्र नाही. ज्यांचे राजकीय आयुष्य वीस वर्षांचेही नाही त्यांना जयप्रकाश काय समजणार?’ लालूपुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही अमित शहा यांना सडेतोड उत्तर दिले. तेजस्वी यांच्यानुसार शहा जे बोलले ते निरर्थक आहे. ‘भाजपचे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. देशात मोदी सरकारकडून लागू असलेल्या अघोषित आणीबाणीबाबत अमित शहा यांनी बोलायला हवे होते. जयप्रकाश नारायण हे देशांतर्गत हुकूमशाहीविरुद्ध लढले. लोकशाही रक्षणासाठी त्यांनी लढा दिला. आज देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाहीच दिसत आहे. अमित शहा सध्याच्या हुकूमशाहीवर का बोलले नाहीत?’ असा सवाल तेजस्वी यादव यांनी विचारला, तो योग्य आहे. देशातील सर्व घटनात्मक संस्थांची मोडतोड आणीबाणीच्या कालखंडात झाली.

आपल्या राजकीय विरोधकांना इंदिरा गांधी यांनी ‘मिसा’सारख्या कायद्याखाली अटक करून तुरुंगात डांबले. त्यात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, चंद्रशेखर, सरसंघचालक देवरस आणि स्वतः जयप्रकाश नारायण यांचा समावेश होता. विरोधकांची सरळ सरळ मुस्कटदाबी सुरू होती व त्याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी दुसऱ्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. त्या लढय़ात लालुप्रसाद यादव, नितीश कुमारसुद्धा होते. त्यांनी तुरुंगवास भोगला. अमितअमित शहा म्हणतात, ‘जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसची धोरणे आणि इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीविरोधात आंदोलन केले होते. पण त्यांचे अनुयायी आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले.’

इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या लढय़ाची आठवण तुम्ही करून देता, पण सध्याचे भाजप शासन तर आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करीत आहे व या आणीबाणीविरुद्ध आज विरोधी पक्षांतील काँग्रेस व इतर विरोधक लढा देत आहेत. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांना कोणी तिलांजली दिली व कोण कोणाच्या मांडीवर बसले हा वाद निरर्थक आहे. इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही कारभाराविरोधात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणले व जनता पक्षाची स्थापना केली. सर्व विरोधकांनी आपले विचार, चिन्ह, अहंकार गुंडाळून ठेवले व जयप्रकाश यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इंदिरा गांधींविरोधात विजय प्राप्त केला.

1977 साली जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर आपण दुसरे स्वातंत्र्य आणल्याचे जनता पक्षाने जाहीर केले आणि जयप्रकाशजींना दुसरे महात्मा गांधी बनवून राष्ट्रपित्याचे स्थान दिले, पण हुकूमशाहीविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांत ऐक्य राहिले नाही व जयप्रकाशजींच्या क्रांतीचा त्यांच्या हयातीतच चक्काचूर झाला. अमित शहा यांना जयप्रकाश नारायण किती कळले? असा प्रश्न नितीश कुमारांनी विचारला. जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, पण देशातील विरोधकांना तरी जयप्रकाश लवकरात लवकर कळले तर बरे होईल.

Post a Comment

Previous Post Next Post