भाजपाकडून शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल शिवसेनेचा इशारा

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.


दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते, त्यानंतर शिंदे यांचे काय होणार?, असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे.


शिंदे गटाचे बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. शिंदे यांचा रामदास आठवले होईल, हे शिंदे गटातील एका नेत्याने खासगीत केलेले विधान बोलके आहे. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील,असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? असा सवाल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post