ब्राम्हणी व्यवस्थेचा व्हायरस नष्ट करण्यासाठी आंबेडकरवादाचा ऍन्टी व्हायरस इम्पामार्फत निर्माण केला जात आहे

जळगाव: ब्राम्हणी व्यवस्थेचा व्हायरस नष्ट करण्यासाठी आंबेडकरवादाचा ऍन्टी व्हायरस इम्पामार्फत निर्माण केला जात आहे अशा शब्दात इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मगन ससाणे यांनी घणाघात केला. इम्पाच्या खान्देशस्तरीय अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
लोकशाहीमध्ये अन्याय दूर करण्यासाठी शिक्षण, प्रतिनिधित्व व मताधिकार या तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. मात्र या तिन्ही गोष्टी ब्राम्हणी व्यवस्थेने संपविल्या आहेत. मनुस्मृतीने या गोष्टी नाकारल्यामुळे आपण व्यवस्थेचे गुलाम झालो. संविधानाने या सर्व गोष्टी बहुजन समाजाला दिल्या त्यामुळे आपली प्रगती झाली. आमचे हक्क व अधिकार अबाधित रहावे यासाठी व स्वातंत्र्य, समता व न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून समाज परिवर्तनासाठी त्याग व समर्पण करण्याची गरज आहे. खाणे,पिणे, झोपणे आणि संतती निर्माण करणे इतकेच मनुष्याचे काम असते तर पशु व मनुष्यामध्ये फरक काय? असा सवाल डॉ.ससाणे यांनी केला.
राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक संघटन असणे आवश्यक आहे,ते काम इम्पा राष्ट्रीय पातळीवर करीत आहे. इम्पा हे गैरराजनैतिक संघटन आहे. संविधानाची अंमलबजावणी न केल्यामुळे आज कॉन्ट्रॅक्ट बेसवर डॉक्टर, इंजिनिअर व प्राध्यापक भरले जात आहेत. म्हणजे ही नवी गुलामगिरी आहे. सध्या जे बहुजन समाजाचे डॉक्टर आहेत ते शेवटचे डॉक्टर असतील. हडप्पा व मोहजोंदडोसारखे आमच्या फक्त खुणाच राहतील. ब्राम्हणी व्यवस्थेचा व्हायरस नष्ट करण्यासाठी आंबेडकरवाद नावाचा ऍन्टी व्हायरस इम्पामार्फत निर्माण केला जात आहे. बहुजन समाजात डॉक्टर्स निर्माण होऊ नयेत म्हणून क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, नीट व इतर योजना व कायदे बनवून ब्राम्हणी व्यवस्था प्रयत्न करीत आहे. फोडा आणि राज्य करा ही ब्राम्हणी निती आहे.आम्ही जर जातीय संघटन बनविण्याऐवजी बहुजन जातींचे संघटन बनवले तरच ब्राम्हणी व्यवस्था उध्वस्त करु शकतो. बहुजन बुध्दीजिवी लोकांनी आपल्या बुध्दीचा, वेळेचा व धनाचा वापर समाजासाठी केला पाहिजे असे डॉ.ससाणे यांनी स्पष्ट केले.
अन्याय करणारा न्याय देऊ शकत नाही. आपले हक्क व अधिकार आपणच वाचवले पाहिजेत. हे अधिकार वाचवायचे असतील तर बहुजन समाजातील डॉक्टर्सनी आपल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.नाहीतर आपला वापर होऊ शकतो असे प्रतिपादन डॉ.मनोजकुमार गावीत यांनी उद्घाटनपर भाषणात केले. आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. या देशात क्रांती करणा-या आमच्या महापुरुषांना बदनाम केले गेले असे डॉ.शाकीर शेख यांनी आपले मत व्यक्त केले.
महापुरुषांचा इतिहास जाणून घेऊन वर्तमानात आपल्याला संघर्ष करावा लागेल. तशी चेतना निर्माण करावी लागेल.भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या नावाने लाखो संघटना कार्यरत आहेत, तरीही आम्ही अन्यायग्रस्त का आहोत? याचा विचार बहुजन समाजाने केला पाहिजे. एकजातीय संघटन आमच्या महापुरुषांना अपेक्षित नव्हते. इम्पा बहुजन समाजाचे संघटन निर्माण करु इच्छिते. यासाठी बहुजन डॉक्टरांनी बहाणेबाजीला थारा न देता निरंतर काम केले तरच भविष्य उज्ज्वल राहील असे इम्पाचे राष्ट्रीय प्रचारक रवी भालेराव यांनी सांगितले.
डॉ.मुदस्सर, डॉ.मनोज गावीत, डॉ.अजय माळी, डॉ.शाकीर शेख, डॉ.कामरान, डॉ माधुरी तायडे, डॉ.वृषाली गांगुर्डे, आर.एम.अडकमोल, महेंद्र वानखेडे विचारपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचलन सुनिल देहडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ.प्रकाश कांबळे तर आभार नितीन गाढे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post