आता.... धान खरेदी खाजगी कंपन्या करणार

गडचिरोली:- सध्या केंद्र शासनाकरिता राखीव धान्यसाठा करण्याकरिता फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया शेतकऱ्यांकडून अन्नधान्याची खरेदी करते, पण येत्या काळात लवकरच खासगी कंपन्या तसेच राज्य सरकारच्या संस्था हे काम सुरू करतील. केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी याबाबतची माहिती दिली. यासंदर्भात राज्य सरकारसोबत अगोदरच याबाबत पत्रव्यवहार सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या संस्थांकडून धान्य खरेदी झाल्यास अधिक समन्वयाने काम होईल, त्याचबरोबर खासगी कंपन्यांना वाव देत त्यांना केंद्र सरकारकरिता धान्य खरेदी करायचे काम दिले तर या क्षेत्रातील कार्यक्षमता वाढेल, असे केंद्र शासनाला वाटू लागले आहे, पण हे धान्य खरेदीचे काम कोणत्या खासगी कंपन्यांना दिले जाणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

भारतात नुकताच आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेत सहभाग घेतला होता. त्यावेळी अनेक देशात सरकारच्या वतीने खासगी कंपन्या धान्याची खरेदी करीत आहेत आणि त्यामध्ये बरीच कार्यक्षमता असल्याचे आपल्याला आढळून आले आहे, जर खासगी कंपन्यांनी कमी खर्चात धान्य खरेदी केले तर त्याला आमची काही हरकत नाही, असेही केंद्र सचिवांचे म्हणणे आहे. पुढील हंगामापासून हे काम सुरू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. केंद्र सरकारने ६० दशलक्ष टन अन्नधान्याचा साठा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सध्या ९० दशलक्ष टनाची खरेदी केली जाते. त्याशिवाय ही खरेदी अतिरिक्त राहणार काय, हे मात्र जाहीर केले गेले नाही. 

पण सरकारकरिताच्या धान्य खरेदीच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांना उतरविले जाणार, हे निश्चित आहे. फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया गहू आणि तांदळाची आधारभूत दराने खरेदी करून नंतर ते धान्य गरजूंना कमी दरात उपलब्ध करून दिले जाते. पण या कंपन्या कोणत्या दराने खरेदी धान्य करेल हे अजूनही स्पष्ट नाही.


Post a Comment

Previous Post Next Post