इतिहासाची मोडतोड केल्यास, याद राखा गाठ माझ्याशी!

इतिहासाची मोडतोड केल्यास, याद राखा गाठ माझ्याशी!



संभाजीराजे छत्रपतींचा चित्रपट निर्मात्यांना इशारा, वेडात मराठे वीर दौडले सात व हर हर महादेव चित्रपट वादात

छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जात आहे. स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही करायचे? इतिहासाची मोडतोड करून चित्रपट काढाल, तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे. मी मवाळ, तसाच कडकही आहे. मीच आडवा येणार अशा चित्रपटांच्या विरोधात. मी छत्रपती घराण्यात जन्माला आलोय, हे अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट निर्मात्यांना दिला. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना काही बाबी या पूर्वनियोजित कटातून होत असल्याचेही दिसून येत आहे. त्याविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अलीकडच्या काळात मराठा शब्दाऐवजी जाणिवपूर्वक मराठी या शब्दाचा भर दिला जातो. शिवकाळात मराठी लोक हा शब्दच नव्हता. मराठा साम्राज्य आहे, ते कशाला बदलताय शब्द. चुकीचा शब्द प्रचलित केला जातोय, त्याला आमचा विरोध आहे. लोकांना आवडते म्हणून काहीही करायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय सैन्यात मराठा लाइफ इन्फ्रन्ट्री रेजिमेंट आहे. त्यात बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, अशा घोषणा दिल्या जातात. अशा महापुरूषाच्या नावाने इतर कुठल्याच रेजिमेंटमध्ये नाव घेतले जात नाही. त्यामुळे आपल्या मराठा शब्दाला एक इतिहास असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
ऐतिहासिक चित्रपट काढताना एक मंडळ पाहिजे. जे मंडळ असे चित्रपट तयार करताना मार्गदर्शन करतील. चुकीचा इतिहास पुढे जाणार नाही. इतिहास अभ्यासकांचे ते मंडळ हवे. राज्य सरकारने ते करावी, अशी माझी मागणी आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
हे काय असले मावळे असतात?
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ऐतिहासिक चित्रपटात काहीही दाखवले जाते. आता वेडात मराठे वीर दौडले सात नावाचा चित्रपट येत आहे. त्यातील मावळ्यांनी कसली वेशभूषा केलीय. असले मावळे होते का? त्यांना काय मावळे म्हणायचे का? या चित्रपटातील सात जणांपैकी वीरांची नावेच बदलली आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. या चित्रपटाच्या अगोदर आमची नावे टाकली आहेत की, आमचा पाठिंबा आहे. परंतु, आम्हाला त्याविषयी माहितच नाही. मी त्याविरोधात कारवाई करायला लावणार आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post