मोबाइलमुळे अल्पवयीन मुली, मुले बिघडतात म्हणून 'या' गावात मोबाईलवर बंदी...

यवतमाळ : मोबाईलमुळे किशोरवयीन मुलांचे भावविश्व व्यापले आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालक अनेक क्लृप्त्या योजतात, तरीही मुलं मोबाईलच्या आहारी जात आहेत. पालक आणि एकूणच समाजाच्या या समस्येवर पुसद तालुक्यातील बांसी गावाने ग्रामसभेच्या अधिकारांचा वापर करत नामी उपाय शोधून काढला आहे. मोबाईलचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांसी ग्रामसभेने १८ वर्षांखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामविकासासोबतच समाजस्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामसभेचा हा ठरावही आगळावेगळा असला तरी, त्याला मुलं किती प्रतिसाद देतात, याकडे गावचे लक्ष लागले आहे.


किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. करोनानंतर ही स्थिती अधिकच भयावह झाली आहे. पुसद तालुक्यातील बांसी गावात ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत अल्पवयीन मुलांसाठी मोबाईल वापरावर बंदीचा हा ठराव घेण्यात आला. याशिवाय शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. हे तीनही ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श पायंडा पाडल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गहुली गावानजीक बांसी हे गाव आहे. एकेकाळी गहुली हे आदर्श ग्राम होते. आता बांसी गावाने मोबाईल बंदीचा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना या मोबाईलमुळे गेम्स, वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागल्याचे अनुभव ग्रामसभेत गावकऱ्यांनी मांडले. त्यामुळे ग्रामसभेने १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाईल वापरावर बंदीचा निर्णय घेण्यात आला. यापुढे मुलांच्या हाती कोणीही पालक मोबाईल देणार नाही, अशी शपथही गावकऱ्यांनी घेतली. या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची ग्वाही गावकऱ्यांनी दिली आहे.

किशोरवयीन मुले, तरुण मोबाईल ॲडिक्ट झाले आहे. मोबाईल हातात असताना मुले आई-वडिलांचे काहीएक ऐकत नाही. ऑनलाईन शिक्षणापेक्षा हा मोबाईल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक आहे. ते टाळण्यासाठी मोबाईलबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आव्हान आहे. मात्र मुलांचे समुपदेशन करून त्यांना समजावून सांगू. ग्रामस्थांचा या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा आहे.
- गजानन टाले सरपंच, बांसी, ता. पुसद.

Post a Comment

Previous Post Next Post