चोरीतील हिस्सा, दे रे भो !

चोरीतील हिस्सा, दे रे भो !
    
      जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यात,दूध सोसायटीच्या सदस्यांनी ठराव द्वारे अधिकृत मतदारांकडून पैसे मागितले.म्हणे तुला संचालक उमेदवाराकडून पाकिट मिळाले त्यातून आमचा हिस्सा दे.खुले आम गाव चावडीवर भांडण झाले.शिणाजोरी,धराधरी, हाणामारी.दूध फेडरेशन लुटमारीचे प्रात्यक्षिक दाखवले.दूध फेडरेशन लुटमारीचे हे छोटेसे युद्ध.मोठे युद्ध माजी व आजी चेअरमन लढत आहेत, पोलिस व कोर्टात."जाऊ जळगावच्या बाजारी! चोरू दही दूध लोणी !! " गावात झाली ती गणगवळण.पोलिस व कोर्टात चालू आहे ते वगनाट्य.
     निवडणूक, प्रतिनिधी, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, झेडपी सदस्य, आमदार, खासदार ही लोकशाही प्रक्रिया जनहिताची धोरणात्मक निर्णय घेणे,अधीन प्रशासकीय यंत्रणा राबवणे, यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे यासाठी असते.पण अजून ही लोकांना समज आहे ,कि निवडणूक जिंकणे म्हणजे तिजोरी लुटून आणणे आणि लोकांत वाटणे.ही पद्धत प्राचीन टोळ्यांमध्ये होती.उत्तरेकडून येणाऱ्या लुटारू मधे होती.चंबळच्या डाकूंमधे होती.शोलेतील गब्बरसींग तेच करीत होता.जळगांव जिल्ह्यातील गब्बरसींग,सांभा,काल्या तेच करीत आहेत.फरक इतकाच कि ते जिवघेणे शस्त्र वापरत होते.आता खाणे पिणे पैसा यांचा वापर करतात.पण हेतू तोच.लुटमार करून आणणे आणि आपल्या लोकांना वाटणे.याच धारणेतून शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील अधिकृत मतदार कडून पैशांची मागणी केली.शेतकऱ्यांचा मागील अनुभव आहे,हेतू आहे कि याला संचालकांकडून कडून मतांबद्दल पैसा मिळाला तर याने आम्हाला वाटला पाहिजे.त्यासाठीच तर आम्ही त्याला ठराव करून मतदान साठी अधिकृत केले होते.
      आता तो मतदार संचालक कडून मतांचे पैसा आणतो.तर संचालक कोठून आणतो? मतदारांना देण्यासाठी पैसा कोठून आणणार? स्वताचे शेत,घर,बंगला,गाडी, दागिने विकून आणणार का? दूध फेडरेशन मधील दूध नासवून,लोणी पळवून,तूप चोरमार्गाने विकूनच आणणार ना! आता टेरीकॉट चे शर्ट वापरणारा, पेट्रोलची फटफटी वापरणारा शेतकरी याला इतके ज्ञान तर असेलच.असलेच पाहिजे.असतेच.आत्ताच जळगाव जिल्हा दूध फेडरेशन मधे लोणीची चोरी,तुपाची चोरी मुळे शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली आहे.हे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती आहे.म्हणून दूध फेडरेशन कर्जबाजारी आहे.बुडणारे आहे.इतके ज्ञान तर प्रत्येक शेतकरी ला असेलच.असतेच.आहेच.तरीही तो त्या नालायक माणसाला ठराव करून समर्थन देतो.तो मतदार त्या महानालायक संचालक उमेदवाराला मतदान करतो.हा नियोजन बद्ध भ्रष्टाचार आहे.विचारात भ्रष्टाचार आहे.आचारात भ्रष्टाचार आहे.कृतीत भ्रष्टाचार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध फेडरेशन बनवले कि ,हा माणूस हक्काने येथे दूध विकू शकतो.नियमित पैसे मिळवू शकतो.शेतीला जोडधंदा करू शकतो.तोच माणूस ,तोच शेतकरी या मानसिकतेतून ठराव करीत असेल, मतदान करीत असेल तर पुढील भविष्य चांगले कसे राहिल? म्हणे शेतकरी कष्ट करतो.मालाला भाव नाही.शेती परवडत नाही.कर्जबाजारी होतो.आत्महत्या करतो.कुटुंब उघड्यावर पडते.सरकारने मदत द्यावी.विधवा बायकोला किंवा पोरा पोरींना नोकरी द्यावी.हे दुष्टचक्र.येथे होतो उगम.गावखेड्यात.
     गाव खेड्यांमध्ये संस्कृती आहे.असते.किंवा होती.असे म्हणतात.आता ही कोणती संस्कृती आहे? कुठे नेणारी संस्कृती आहे? आपल्याच हितासाठी बनवलेल्या संस्था, ग्रामपंचायत, सोसायटी, फेडरेशन,बॅंक लुटून खाणे.गावात बारा महिने काही ना काही देव धर्म,भजन, किर्तन प्रवचन,सप्ताह,भंडारा चालूच असतो.काशी, मथुरा, पंढरपूर ,शिर्डी ,शेगांव तिर्थयात्रा चालूच असतात.कशासाठी? माणसाने नितीमत्तेची चाकोरी सोडू नये म्हणून.पण येथे तर वेगळीच घिसांडी पडलेली आहे.जो लुटमार करुन आणतो तोच आपला नेता.जो पैसे देईल तोच आपला नेता.मग तो दारु विकणारा असो कि कु़ंटणखाना चालवणारा असो कि चोरी करणारा असो कि रेती माफिया असो,शेतकरी त्याला निवडून देतो.हे दुष्टचक्र जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत शेतकरी हिताचे जे जे घडवलेले आहे,स्थापन केलेले आहे ते टिकणार नाही.
      आत्ताच ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक झाली.सरपंच आणि सदस्य निवडून आणलेत.आधिकतम गावात आधिकतम लुटारू जास्त निवडून आणलेत.आम्ही ग्रामीण भागातील समस्या घेतल्या ,कायद्याला अनुसरून लढलो तर गावातील गरजूंना वंचित ठेवण्यात सरपंच व सदस्य जास्त जबाबदार आढळलेत.अनेक सरपंचांनी गरीबांना घरकुल दिले नाहीत.सरकारने दिले ते सुद्धा मिळू दिले नाहीत.गावठाण जमीन कलेक्टर ने मंजूर केली तरीही बीडीओ ला पैसे देऊन घरकुल साठी मिळू दिली नाही.झेडपी सीईओ तर त्याहून जास्त नालायक.तो तर लुटायलाच आला आहे.सरपंचाने अनुदानित विहीरी स्वताचे शेतात खोदून घेतल्या.शेतात जागा उरली नाही तेंव्हा भाऊबंदकी ला दिल्या.सरकारने शौचालय साठी पैसा दिला.तो सुद्धा सरपंचांनी शौचालय न बांधता परस्पर निधी हजम केला.अर्थात यात ग्रामसेवक,बीडीओ,सीईओ सुद्धा सहभागी आहेतच.नोकर तो नोकरच.गावाचा सरपंच गावकऱ्यांना लुटतो तर आपण तरी का प्रामाणिक असावे? या चोरीत झेडपी सदस्य, आमदार, पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री सुद्धा लाभार्थी आहेतच.जयंत पाटील,पंकजा मुंडे,हसन मुश्रीफ, गिरीश महाजन यांनी सुद्धा ही लुटमार चालू ठेवली.हेच मंत्री,ज्यांना आपण आमदार निवडून देतो, मंत्री बनतात,आपण गुलाल टाकून मुर्खासारखे नाचतो,तोच जर आपल्याला लुटत असेल तर मतदारांनी शहाणे झाले पाहिजे.
      मा.गिरीश महाजन ग्रामविकासमंत्री झाले.मला बरे वाटले.आपल्या जिल्ह्यातील आमदार आता ग्रामविकासमंत्री आहेत तर मी त्यांना समक्ष भेटून सचवले कि, जळगाव झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधील तक्रारींचा आपण निपटारा करा.कर्मचारी , अधिकारी विरूद्ध तक्रारदार किंवा लाभार्थी आमनेसामने बसवून निवाडा करू.तुम्ही जरी यातून हप्ते घेत नसले तरीही तुमच्या नावाने लुटमार चालू आहे.आणि जर हप्ते घेत असाल तर जळगाव जिल्हा सोडून द्या.डाकीण ही एक घर सोडते.आपण एक जिल्हा सोडून द्या.पण मा. गिरीश महाजन यांनी अजूनही यासाठी वेळ दिला नाही.जर हे सरकार कोर्टाच्या निर्णयामुळे किंवा लाथामारी मुळे किंवा झोंबाझोंबी मुळे पडले तर पश्चात्ताप होईल. तुम्ही ग्रामविकासमंत्री बनून जिल्ह्यातील लोकांना काय फायदा झाला?पुढची जळगाव लोकसभा निवडणूक तुम्हाला लढायची आहे.तोपर्यंत तरी आता कोणतीही छुटपुट निवडणूक लढू नका.हेच आवरले जात नाही,सावरले जात नाही तर आणखी जास्त लोभात पडू नका.शेण उचलले जात नाही,लेंड्या कसे उचलणार? जळगाव जिल्हा पुरते तरी मंत्री पदाचा चांगला उपयोग करुन घ्या.
        आमदार आणि मंत्री हे नारळाचे झाड आहे.त्यांच्या कानापर्यंत हात पोहचत नाहीत.शेतकऱ्याचा तेथपर्यंत हात पुरत नाही.पण गावातील सरपंच, सदस्य, सोसायटी सदस्य, चेअरमन हे तर भुईमुगाची झुडपे आहेत.येथे हात काय पाय ही पोहचतो.ज्याच्यासोबत लग्न,मरण,धरण ला सोबत असतात.रोज चावडीवर बसतात.एकमेकांची तंबाखू,चुना चोळून खातात.त्याची आगपेटी मागून बीडी पेटवतात. त्यांना तर नखशिखांत ओळखतात.नक्कीच.जर इतके जवळ राहून चांगला किंवा बदमाष माणूस ओळखता येत नसेल तर तो मतदान करण्याची लायकीचा नाही.ही लायकी यावी , माणूस ओळखता यावे,आपले हित समजावे यासाठी आम्ही माणसाला जागृत करीत असतो.हक्कासाठी, अनुदानासाठी,विकासासाठी सरकारी यंत्रणा आहेत,त्यांची माहिती करून देत आहोत.पण येथे कटोरा धरून नाही तर कवटी घेऊन आले पाहिजे.मेंदू,हृदय, काळीज घेऊन आले पाहिजे.आधी माणूस जागृत झाला पाहिजे.तरच तो आपल्या हितासाठी विचार करू शकतो.
आपुल्याचि हिता,असे जो जागता.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post