शेतकरी मताचे महत्व जाणत नाही.


   देशांत शेतकरी मतदार जास्त आहेत.जर शेतकऱ्यांनी ठरवले तर फक्त शेतकरी उमेदवाराला आमदार निवडून दिले तर शेतकरी हिताचे निर्णय घेऊ शकतात.पण शेतकरी मतदार शेतकरी उमेदवाराला मतदान करीत नाहीत.उदाहरण आहे,शरद जोशी.शरद जोशी सर्वाधिक अभ्यासू व प्रामाणिक शेतकरी नेता होते.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मतदान केले पण शेतकरी उमेदवाराला नाही.राजू शेट्टी हे सर्वाधिक प्रामाणिक, अभ्यासू,लढावू शेतकरी नेता आहेत.त्यांना डावलले शेतकऱ्यांनी.आणि विरोधातील कोण माणूस निवडून दिला,तो मलाही नांव आठवत नाही.असा उमेदवार ,असा आमदार किंवा खासदार जो शेती करीत नाही,फक्त कर वाचवण्यासाठी शेती घेऊन ठेवतो,तो कशाला शेतकरी ची बाजू मांडेल? जळगाव जिल्ह्यातील कोणता आमदार शेतकरी आहे? एकही नाही.जरी त्यांचे बाप शेतकरी असले तरीही नाही.खडसे, महाजन, देवकर, गुलाबराव,सोनवणे,सावकारे , चव्हाण, किशोर पाटील ,अनिल पाटील, भोळे , चौधरी यापैकी कोणीही शेतकरी नाही.शरद पवार , अजितदादा सुद्धा नाहीत सुप्रिया सुळे तर बिलकुल नाहीत.ठाकरेंनी,राऊतांनी शेती चित्रात पाहिली असेल.त्यांचेकडे शेती असली तरी ती फार्म हाऊस साठी आहे.कांदा,मिरची, कापूस,गहू, हरभरा साठी नाही.मोदी शेतकरी नाहीत.फडणवीस शेतकरी नाहीत.एकनाथ शिंदे एके काळी शेतकरी होते.म्हणून ते शेतकरी बाबत लवकर निर्णय तरी घेतात.बाकीचे आमदार तर शेतकरी असल्याची बतावणी करतात.आमदाराला सरकारकडून दीड दोन लाखाचे तगडे मानधन,गाडी ,बंगला मिळतो कि तो कलेक्टर ची बरोबरी करतो.वरून चाळीस,पन्नास कोटी निधीतून वीस टक्के कमीशन.बापरे! तो शेतकरी कसा असू शकतो?ज्याला झळ नाही त्याला कळ कशी कळेल? इतका लठ्ठ,गठ्ठ पैसा मिळाला तर तो शेतात औत हाकलणाऱ्या शेतकरीचे त्राण कसे अनुभवणार ?शरद पवार शेतकरी म्हणवून घेतात स्वताला.त्यांच्या कुटुंबात किती साखर कारखाने आहेत?किती शाळा कॉलेज आहेत?कुठे कुठे शेयर आहेत? शेतकरी शेकडा किंवा हजारात मोजतो. कधीतरी लाखात मोजतो.पण आमदार खासदार तर कोटी कोटीत मोजतात.आमदार मुंबई ते गुवाहाटी फास्ट पळाला तरी पन्नास खोके?काम नाही करीत डोके ! ऑलिंपिक मधे रनर पीटी उषाला सुद्धा इतके खोके मिळाले नाहीत. एकदा का झेडपी सदस्य किंवा सरपंच निवडला कि भाऊ गावठी किंवा देशी घेतच नाही.फ्रिजमधे इंग्लीश ठेवतो.पाणी नव्हे.बर्फ!असा तर्र माणूस मर्र शेतकरी साठी काही कशाला मरेल? ज्या वजन काट्यावर शेतकरी कापूस मोजतो त्याच वजन काट्यावर आमदार पैसे मोजतो,बापा हो!
     दूध फेडरेशन हे शेतकरी साठी बनवले . शेतकरी चा दुय्यम धंदा आहे. दुध विक्री साठी हक्काचे ठिकाण आहे.पण आज रोजी एकही संचालक शेतकरी नाही.शेतकऱ्यांनी मत विकले, संचालकांना.जळगांव जिल्ह्यातील भालोद गावची व्हिडिओ क्लिप पहा.कोणीही जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांसाठी आहे.पण काल आणि आज एकही संचालक शेतकरी नाही.एकही चेअरमन शेतकरी नाही. शेतकरी माणूस आमदार झाला तर तो शेतकरी साठी राबला पाहिजे.अमळनेर चे माजी आमदार गुलाबराव पाटील शिंगाडा खांद्यावर घेऊन शेतकरीच्या गाडीवर बसून डरकाळी फोडत असत.म्हणे, शेतकरी त्याचा कापूस कुठेही विकू शकतो. सरकार घाबरले होते.तशी मोकळीक दिली होती.आता तसा कोणता आमदार आहे ?
       शेतकरी पुढारी झाला कि शेतकरी राहातच नाही.तो दुसरा धंदा सुरू करतो.ज्यात खोऱ्याने पैसा मिळवतो.फक्त सांगतात,मी शेतकरी आहे.मी शेतकरी चा मुलगा आहे.आणि तोच शेतकरीला लुटतो.कुऱ्हाडीचा दांडा बनतो.म्हणून एकाला एकदाच आमदार निवडून दिले पाहिजे.या, जळगाव जिल्हा सहकारी बँकेत.सर्वच नोकर सांगतात कि मी शेतकरी चा मुलगा आहे.पण शेतकरीचे रक्त पितात.हिच परिस्थिती धुळे,नाशीक,नगर, औरंगाबाद जिल्हा बँकांची आहे.
    माझे निरीक्षण आहे.शेतकरी मतदार शेतकरी उमेदवाराला मत देत नाहीत.सरळ सरळ विकून टाकतात.तसाच मजूर सुद्धा त्यांचे हित जोपासणारे उमेदवाराला मत देत नाहीत.ते सरळ सरळ मत विकून टाकतात.मग ते विकत घेणारा गुन्हेगार, बलात्कारी,अतिरेकी असला तरी चालतो. शेतकरी आणि मजूर त्याला मत विकतात.
    शेतकरीचे व शेतमजूराचे दारिद्र्याचे खरे निदान जाणल्याशिवाय त्यावर उपाय होणार नाही.मला भाव द्या,मला भाव द्या असे म्हणून काहीच मिळत नाही. मिळते फक्त भीक.भीक वर किती दिवस निघतात?मला माफ करा.मला माफ करा.केले माफ.पुन्हा तोच ताप.कर्ज माफ केले.वीजबील माफ केले.तर माफीवर जगणाऱ्या शेतकरीची गणना कशात होईल?ज्याला तुम्ही कणा म्हणतात,तो तरी सरळ राहिल का? शेतकरीने आर्थिक व्यवस्थेची कडी बनले पाहिजे.आर्थिक भागीदार बनले पाहिजे.पेट्रोल ,दारू,औषधी,शिक्षण जसे अत्यावश्यक बनले आहे तसेच धान्य,तेल ,मिरची ही आवश्यक बनले पाहिजे.पण शेती उत्पादन अतिरिक्त झाल्याने ते स्वस्त बनले आहे.दहा रूपयांचा साबण बारा महिने पडून राहिला तरी उत्पादक दहा रुपयालाच विकतो.तसे शेती उत्पादन बाबत शेतकरी अडून बसत नाही.उलट तो गाडीत माल भरून बाजारात फिरतो.कुणी कापूस घेता का , कापूस ? तेथेही शेतकरी ची औलाद नोकरीवर असूनही शेतकरीला लुटते.हमाल,मापाडी,ग्रेडर हे सुद्धा शेतकरीची औलाद असते.ते सुद्धा शेतकरीला लुटतात,फसवतात. ग्रेड देण्यासाठी ग्रेडर लांच घेतात. त्यांचेवर दलाल,आडतदार, व्यापारीचे नियंत्रण असते.  
   शेतकरीसाठी सुत गिरणी काढली.बुडवली.शेतकरीसाठी दूध फेडरेशन काढले.बुडवले.शेतकरी साठी भु विकास बँक काढली.बंद पडली.शेतकरी साठी जिल्हा बँक काढली.ती व्यापाऱ्यांच्या कब्जात गेली.शेतकरी साठी साखर कारखाना काढला.तो बंद पाडला.आता व्यापारी चालवत आहेत.शेतकरी साठी जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत काढली.त्यावर ठेकेदार, रेती माफिया, दारू दुकानदारांना शेतकरीच निवडून देतात.मत विकून.मी अशी अनेक झेडपी सदस्य व पंचायत समिती सदस्याची यादी देतो कि ,जो रेती माफिया आहे तो झेडपी सदस्य निवडून दिला.जो दारू बनवून विकतो त्याला पंचायत समिती वर निवडून दिला.जो बिल्डर आहे,त्याला झेडपी सदस्य निवडून दिला.ज्याने कधी बैल हाकलला नाही,कधी चारा घातला नाही,कधी दोराची गाठ मारली नाही तो झेडपी सदस्य निवडून दिला. शेतकऱ्यांनीच.धरणगांव तालुक्यातील ही माहिती आहे.अमळनेर तालुक्यातील आमदार ची बायको झेडपी सदस्य दिली होती.शौचालय कशाशी खातात ,तेच माहिती नाही. एकदा तर दारू विकणारा आमदार निवडून दिला होता.चोपडा तालुक्यातील प्रोफेसर महिला झेडपी सदस्य निवडून दिली होती.पारोळा तालुक्यातील रोड बांधकाम ठेकेदार झेडपी सदस्य आहे. एक तर आमदाराचा मुलगा आहे.त्याचाच प्रस्ताव.त्याचेच इस्टीमेट.त्याचेच टेंडर.त्याचेच कम्प्लीशन सर्टिफिकेट.त्याचे सिंमेट ,डांबर कोण मोजणार? मोजली तर धमकी देणार.आमच्या नादाला लागायचे नाही.हं! एक तर डॉक्टर झेडपी सदस्य आहे.धरणगांवच्या आमदाराचा मुलगा झेडपी सदस्य निवडून दिला आहे. सांगा ,शेतकरी ची बाजू मांडणारा एकही शेतकरी झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून दिला नाही.कारण काय?गरीब शेतकरी उमेदवार कडे दारू,मटण , साठी पैसा नाही.मतासाठी पैसा नाही. म्हणून शेतकरी आणि शेतमजूर हे शेतकरी उमेदवाराला मत देत नाहीत.ते कोणीही ऐरागैराला मत विकून टाकतात.कोरोनाचा किडा सापडला.त्याचे म्युटंट नातेवाईक सापडले.पण फुकट मत देणारा शेतकरी सापडला नाही.फुकट मत देणारा शेतमजूर सापडला नाही.सांगा,कोण बाजू घेईल शेतकरीची? म्हणून शेतकरी नेहमीच हक्कापासून वंचित राहिला आहे.हिच मेख आहे, शेतकरी मागे राहिल्याची.शोधावे लागेल, शेतकरीचे भविष्य कुठे दडलेले आहे?
     मागून मिळते ते शाश्वत असत नाही.ते तात्पुरती गरज भागवते.शेतकरीने देशाच्या आर्थिक साखळीतील कडी बनली पाहिजे.येथे शेतकरी कमी पडतो.याचा अभ्यास झाला पाहिजे.उद्योगपती, व्यापारी हे सरकार वर नियंत्रण ठेवतात.नोकरवर्ग सरकार ची अडवणुक करतात.तसे शेतकरीचे कोणतेही नियंत्रण सरकार वर नाही.शेतकरीचे कोणतेही नियंत्रण आमदार खासदार मंत्री वर नाही.मी असे का बोलतो?मी असे का लिहीतो? कारण माझा कोणत्याही आमदार, खासदार, मंत्री कडे अर्ज नाही.कोणत्याही सरकारचे कर्ज नाही.म्हणून उघड बोलणे वर्ज्य नाही.फरक आहे.मी पिस्तूलच्या गोळ्या खाऊन मरणार.शेतकरी आत्महत्या करून मरणार.
    उदाहरण देतो. जळगाव तालुक्यातील धानवड व पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथे आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच ने आंदोलन करून शेतकऱ्यांना अनुक्रमे ६७ लाख व ४८लाख बोंडअळीची नुकसानभरपाई मिळवून दिली.तर तेथील आमदारांनी आम्हाला विरोध तर केलाच पण पोलिसात गुन्हा देखील दाखल केला.म्हणे हे सार्वजनिक जागेवर कसे काय आंदोलन करतात?म्हणे हे शेतकऱ्यांना आंदोलन साठी प्रवृत्त करतात.किती नालायक आमदार असतील? सरकारने बोंडअळीची नुकसानभरपाई ची रक्कम तहसीलदार च्या खात्यात टाकली.पडून आहे.पण वाटप करीत नाहीत.यासाठी तर आंदोलन करायची गरज काय?येथे आमदार काय कामाचा?येथे मंत्री काय कामाचा? शेतकरी नेता म्हणवून घेतो स्वताला. आणि शेतकरी सुद्धा.या आंदोलनात सहभागी झालेल्या उंदीरखेडे येथील उमेश पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले नाही.म्हणे ,मतांचे पैसे दिले नाहीत.ही मानसिकता शेतकऱ्यांची आहे.शेतकरी आपले मत विकतो.आपले हक्क विकतो.हक्क विकले तर लाचारी नशीबी येणारच.ज्यांनी अब्रू विकली त्यांना सामाजिक स्थान नसते.ज्यांनी मत विकले त्यांना राजकीय स्थान नसते.अब्रू आणि मत ही विकायची वस्तू नसते.ती प्रतिष्ठा आणि पत असते.ती " इथीकल असेट "असते."कॅपीटल असेट " समजून विकू नका.प्रतिष्ठा आणि पत गमावलेली माणसे पायदळी तुडवली जातात.

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post