चीनमधील कोव्हिडवरील निर्बंध शिथिल, परदेश प्रवासाचीही परवानगी

चीनमधील कोव्हिडवरील निर्बंध शिथिल, परदेश प्रवासाचीही परवानगी


चीनने कोव्हिडवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमधील नागरिकांनी परदेश प्रवासासाठी बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल एका महिन्यानंतर प्रवासावरील बंधने शिथील करण्यात आली आहे.

परदेश प्रवासासाठी इच्छुक असणाऱ्या चिनी नागरिकांसारखी पासपोर्ट अर्ज 8 जानेवारी पासून सुरू होतील.

ट्रॅव्हल बुकिंग साइटवर ट्राफिक प्रचंड प्रमाणात येत आहे.

चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कोव्हिड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे जपानने म्हटले आहे. तसेच भारताने देखील विमानतळावर उतरल्यावर कोव्हिड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक असेल असे म्हटले आहे.

कोट्यवधी लोकांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग
गेल्या काही दिवसात चीनमध्ये कोव्हिडची नवी लाट आली होती. BF.7 या व्हेरियंटने तिथे उच्छाद मांडला होता.

चीनच्या अधिकाऱ्यांच्या मते येत्या काही महिन्यात देशामध्ये 19 ते 80 कोटी लोकांना कोव्हिडचा संसर्ग होऊ शकतो असे अंदाज देखील वर्तवण्यात आले होते.

चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 लाख असू शकते, असं एनपीआरचा अहवाल सांगतो. मात्र, चीनने प्रसिद्ध केलेला अधिकृत आकडा यापेक्षा खूप कमी आहे.

चीनमधील अधिकृत आकडेवारीनुसार मंगळवारी (20 डिसेंबर) कोव्हिडच्या संसर्गामुळे पाच मृत्यू झाले आणि सोमवारी (19 डिसेंबर) दोन मृत्यू झाले. चीन ज्या तऱ्हेने मृत्यूंची गणना करत आहे, ती पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांमध्ये न बसणारी आहे. केवळ श्वसनाच्या संसर्गामुळे झालेले मृत्यूच चीन कोरोनामुळे झालेले मृत्यू असल्याचं मानत आहे.

चीनसोबतच दक्षिण कोरिया, जपानमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणं वेगाने वाढत आहेत.
चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या अधिसूचनेमध्ये आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे की, “भारत आपल्या कोव्हिडसंबंधीच्या पाच टप्प्यांच्या उपाययोजनेच्या माध्यमातून संसर्ग रोखण्यासाठी सक्षम आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण आणि कोव्हिडसंबंधीच्या नियमांचं पालन करून हा संसर्ग आटोक्यात ठेवता येऊ शकतो.

चीन, जपान, ब्राझील, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये कोरोनाची प्रकरणं वेगाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे आपण सर्व पॉझिटिव्ह केसेसचं जीनोम सिक्वेन्सिंग करायला हवं, जेणेकरून व्हेरियंट कोणते आहेत हे ट्रॅक करता येईल. मी सर्व राज्यांना आवाहन करतो की, त्यांनी कोरोनाशी संबंधित नमुने हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवावेत.”
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (20 डिसेंबर) भारतात कोरोनाचे 112 रुग्ण आढळले. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3490 आहे.

चीनवर प्रवास बंदी घालण्याची मागणी
सोशल मीडियावर चीनमधील वाढत्या संसर्गाशी संबंधित व्हीडिओ शेअर केले जात आहेत. हे व्हीडिओ शेअर करतानाच लोक भारत सरकारकडे चीनवर पूर्णपणे प्रवास बंदी घालण्याची मागणीही करत आहेत.

चित्रपट निर्माता तनुज गर्ग याने एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्याने सोबत म्हटलं आहे, “माझी अस्वस्थता वाढत आहे. आपण हातावर हात ठेवून बसलो आहोत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे आणि अजून एका नवीन व्हेरिएंटचा धोका आहे. जर आपण आपल्या देशात कोरोनासंबंधीचे नियम कडक नाही केले, तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.”
करण वर्मा नावाच्या एका युजरने लिहिलं आहे, “चीनवर तातडीने प्रवास बंदी लावण्यात आली पाहिजे. कोरोनाशी लढण्यासाठी आपण तयार असायला हवं. काहीही झालं तरी देशात 2021 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होता कामा नये.”
भारतात कोव्हिड ट्रॅक करणाऱ्या प्रोफेसर शमिका रवी यांनीही यासंबंधी ट्वीट केलं आहे, “चीन कोरोना संसर्ग ज्यापद्धतीने हाताळत आहे, ते म्हणजे कोव्हिडची परिस्थिती कशी हाताळू नये याचंच उदाहरण आहे. ते ज्या कठोर ‘झीरो कोव्हिड’ धोरणाबद्दल बोलत आहेत, त्यातल्या त्रुटी समोर आल्या आहेत. आता चीन या आरोग्य संकटासोबतच व्यापारविषयक संकटाला सामोर जात आहे.”

चीनमध्ये नेमकं काय सुरू आहे?
चीनच्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे 80 कोटी लोक संक्रमित होऊ शकतात आणि मृतांचा आकडा पाच लाख असू शकतो.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अधिकारी शू वेंबो यांनी पत्रकारांशी बोलताना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट वेगाने म्युटंट होणारा असल्याचं सांगितलं. मात्र, तो फार धोकादायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

अमेरिकेतील संस्था एनपीआरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, कोरोनाच्या या लाटेत देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला संसर्ग होऊ शकतो, असं येल विद्यापीठात सार्वजनिक आरोग्यावर संशोधन करणाऱ्या आणि चिनी आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ शी चेन यांनी म्हटलं. चीनमधील आरोग्य अधिकारी डॉक्टर शाओफेंग लिएंग यांचा हवाला शी चेन यांनी दिला.

अहवालामध्ये म्हटलं आहे, “याचा अर्थ येणाऱ्या 90 दिवसात पृथ्वीवरची 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होऊ शकते.”
या महिन्याच्या सुरूवातीला चीनने आपलं झीरो कोव्हिड धोरण काहीसं शिथील केलं. त्यानंतर इथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

चीनमधील अधिकृत आकडेवारीनुसार मंगळवारी (20 डिसेंबर) कोव्हिडच्या संसर्गामुळे पाच मृत्यू झाले आणि सोमवारी (19 डिसेंबर) दोन मृत्यू झाले. चीन ज्या तऱ्हेने मृत्यूंची गणना करत आहे, ती पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांमध्ये न बसणारी आहे.

चीन केवळ न्यूमोनियासारख्या श्वसनाशी संबंधित आजारामुळे झालेले मृत्यूच कोव्हिडमुळे झाल्याचं गृहीत धरत आहे. हीच पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीच्या बरोबर उलट आहे.

देश आपापली मानकं निश्चित करून कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी सादर करत आहे. अशावेळी देशांमध्ये तुलना करणंही अवघड होतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

थेट कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, मात्र कोरोनाशी संबंधित कारणांमुळे झाला असला तरी त्याचा समावेश कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्येच करावा ,असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

चीनमधलं हे संकट धोक्याची घंटा?
अमेरिकन वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये चीनमधल्या कोव्हिडच्या नवीन लाटेबद्दल एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यात म्हटलं आहे की, “चीनचं झीरो कोव्हिड धोरण हे टिकणारं नव्हतंच. त्यातही ते धोरण कोणत्याही तयारीशिवाय आणि बॅकअप प्लॅनशिवाय शिथील करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे इथल्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला. या निर्णयामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.”

“हे संकट सगळ्या जगालाही हादरवून टाकू शकतं. तीन वर्षांपूर्वी वुहानमध्ये झालेल्या कोरोनाच्या उद्रेकानंतर सगळं जगही ठप्प झालं होतं. जे चीनमध्ये घडतंय, ते त्या देशापुरतंच मर्यादित राहील असं नाहीये.”

या लेखात पुढं म्हटलं आहे, “जिनपिंग सरकारने कोरोना काळात कठोर धोरणांचा अवलंब केला, लोकांना जबरदस्तीने क्वारंटाइन केलं. मात्र 7 डिसेंबरला चीनने कोरोनासंबंधीचे सर्व नियम शिथील केले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी म्हटलं. पण सध्याचं चित्र पाहता परिस्थिती आटोक्यात नसल्याचंच दिसत आहे.”
“बीजिंगमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग अशा वेगानं पसरत आहे की, हे शहर ओसाडवाडी बनत आहे. ही भीती बीजिंगपुरती मर्यादित नाहीये, तर सगळ्या चीनमध्येच असं वातावरण आहे.

आकडेवारी दडविण्यासाठीच ओळखलं जाणारं चिनी सरकार दररोज समोर येणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांची नीट नोंदही ठेवत नाहीये. अनेक ट्रॅकिंग अॅप डिअॅक्टिव्हेट करण्यात आलेत. त्यामुळे चीनमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे, कोरोनाची आकडेवारी काय आहे, याबद्दल गोंधळाचीच परिस्थिती आहे,” असं वॉशिंग्टन पोस्टच्या लेखात म्हटलं आहे.

नियम शिथील केल्यामुळे भलेही लोकांना बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, पण परिस्थिती अशी आहे की लोकच स्वतःला घरात कोंडून घेत आहेत.

“चीनसाठी हे संकट अजूनच गहिरं होऊ शकतं. कारण त्यांच्या 60 हून अधिक वय असलेल्या लोकसंख्येपैकी केवळ 69 टक्के लोकांनीच बूस्टर डोस घेतला आहे. 80 हून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये बूस्टर डोस घेतलेल्या लोकांची संख्या तर अजूनच कमी आहे. या लोकांना ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका जास्त आहे.”

चीनमधून ज्या बातम्या समोर येत आहेत, त्यावरून मृतांचा आकडा वाढत जातोय हे स्पष्ट दिसतंय. स्मशानातले कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. गणिती प्रारुपानुसार विचार करता चीनमध्ये पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला 10 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.”

औषधांची रिकामी होणारी दुकानं आणि हॉस्पिटलमध्ये वाढते बेड
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं लिहिलं आहे की, 2019 मध्ये जेव्हा वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हापासून आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे केवळ 5242 लोकांचा मृत्यू झाल्याचं चीनने त्यांच्या अधिकृत आकडेवारीमध्ये म्हटलं आहे.

त्यामुळेच चीन आता जे आकडे दाखवत आहे, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

सात डिसेंबरपासून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीये. त्यामुळे चीनमधल्या कोरोना मृत्यूंची संख्याही अधिक असू शकते.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, “राजधानी बीजिंगमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी निर्धारित केलेल्या स्मशानांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सुरक्षा गार्ड या स्मशानांच्या फाटकांवर गस्त घालत होते.”

रॉयटर्सनं म्हटलं आहे की, बीजिंग या संसर्गाचा हॉटस्पॉट आहे. शांघाय शहरातही संसर्ग वेगानं पसरत आहे, इथे रस्त्यावर दिवसाही कोणी दिसत नाहीये. साहजिकच, कोव्हिडची वाढती रुग्णसंख्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरचा दबाव वाढवत आहे.

चीनमध्ये मेडिकलच्या अनेक दुकानं रिकामी झाली आहेत. लोक घाबरून औषधांचा साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे अनेक गरजेची औषधंही मिळत नाहीयेत.

चीनमधील रुग्णालयातील आरोग्य सुविधा वाढविल्या जात आहेत. नवीन आयसीयू बनवले जात आहेत. बेड्सची संख्या वाढवली आहे.

गेल्या आठवड्यात बीजिंग, शांघाय, वांग्झाऊ, चेंग्दूसह देशातील प्रमुख शहरांनी तापावर उपचारासाठी तात्पुरते दवाखाने उघडल्याची घोषणा केली. काही खेळाच्या मैदानांचं रुपांतरही क्लिनिकमध्ये करण्यात आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post