महाराजाला मिळणार होते 30 लाख रुपये पण मैदानावरून काढला पळ


नागपुर:- दिव्यशक्ती असल्याचा दावा करणारे व बागेश्वर सरकार नावाने ओळखले जाणारे २६ वर्षीय तरुण धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे आव्हान न स्वीकारताच नागपूरच्या (Nagpur) रेशीमबाग मैदानावरून पळ काढला आहे.

धीरेंद्र कृष्ण महाराज भोंदू व ठग असून, त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून अटक करावी, अशी मागणी समितीचे सहअध्यक्ष व अखिल भारतीय अंनिसचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव (Shyam Manav) यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रा. मानव म्हणाले, बागेश्वर धाम, छत्तरपूर (मध्यप्रदेश) येथील धीरेंद्र महाराज यांनी दिव्य दरबारात विविध दावे केले आहेत.

त्यांच्या चमत्कारिक दाव्यासंबंधी जादूटोणा विरोधी कायदा २०१३ आणि ड्रग अँड मॅजिक रेमेडिज ॲक्ट १९५४ या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा ठरू शकणारे दिव्य दरबारमधील व्हिडिओज व सर्व पुरावे लिखित स्वरूपात ८ जानेवारी रोजी साहाय्यक पोलिस (Police) आयुक्त (गुन्हे) (Police Commissioner) रोशन पंडित यांच्याकडे दिले.

१० जानेवारीला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनाही प्रत्यक्ष भेटून यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी केली. तक्रार नोंदवून तीन दिवस होऊनही अद्याप महाराजांना अटक करण्यात आली नाही. ताबडतोब अटक न झाल्यास आंदोलन व आवश्यकता पडल्यास न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, असेही प्रा. मानव म्हणाले. याशिवाय या कार्यक्रमाद्वारे प्रचार व प्रसार करणाऱ्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

महाराजांचा भंडाफोड करण्यासाठी येत्या १९ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता रमण विज्ञान केंद्राजवळील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला हरीश देशमुख, छाया सावरकर, सुनील पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते. महाराजांचे नागपूरमध्ये रामकथा प्रवचन होते. यानिमित्त त्यांनी ‘दिव्य दरबार’ आणि ‘प्रेत दरबार’ घेतला. महाराजांचे यू ट्यूबवर चमत्कार व दिव्यशक्तीचे दावे केले आहेत.


या दाव्याला अंनिसने आवाहन दिले आणि त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा व ड्रग्ज अँण्ड मॅजिक रेमेडीज अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रधान दक्षता अधिकारी व सहायक पोलिस आयुक्त रोशन पंडित यांना निवेदन दिले. पण कारवाई झाली नाही. उद्या १४ जानेवारीपर्यंत महाराज नागपुरात थांबणार होते. पण अंनिसच्या आव्हानानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी येथून पळ काढला.

Post a Comment

Previous Post Next Post