लढण्याआधी हारू नकोस! मारण्याआधी मरू नकोस!!


 जळगाव मधील शिक्षित उच्चशिक्षित माणूस गुंडांना घाबरून अंग चोरून चालतो.ते शिक्षित असले तरी त्यांचा समज झाला आहे कि या गुंडांच्या मेहरबानी ने आपण ,आपले कुटुंब सुरक्षित आहोत.
शहराबाहेरील काही वस्तीतील माणसे तर सरळ मत विकतात.येथे दोन लाख लोक मत विक्रीसाठी चौकात उभे असतात.जसे बांधकामांचे मजूर चौकात उभे असतात.
शहरातील शिक्षित, उच्चशिक्षित,धनवान लोक आपले आहे ते धन आणि अब्रू वाचवण्यासाठी अंग चोरुन असतात.कोणाचेही गुनगान गातात.अजून बायकोला,पोरीला त्रास दिला नाही म्हणून गुंडांचे आभारही मानतात.
इतिहासात उल्लेख आहे म्हणून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याआधी अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होती म्हणे.कोणीही घोडेस्वार येत आणि बायका उचलून नेत,धन दौलत लुटून नेत.काही प्रमाणात तशीच परिस्थिती जळगाव ची झालेली आहे.
  डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्रोफेसर , व्यापारी माणसे जळगाव मधे राहातात.पैसा कमवणे हेच एकमेव ध्येय त्यांचे असू शकते.सुरक्षित असू द्यावे म्हणून ते गुंडांना पैसा देऊन सुटका करून घेतात.जसे रामगडची भयभीत माणसे गब्बरसींग टोळीला लगान देत असत.
    जळगाव मधील शिक्षित, उच्चशिक्षित माणसे म्हणतात,नको ! ते आमचे क्षेत्र नाही.आम्ही टेरीकॉट, नायलॉन,पॉलिथीन माणसे आहोत.
   अशा धनासक्त आणि भयग्रस्त लोकांना निरासक्त आणि निर्भय होण्यासाठी मी शुभेच्छा देतो. समोर जाऊन, बोलून आवाहन ही देतो.जळगांवकरांनो,हा बघा मी आहे मैदानात.कोणी केला का माझा खून?तर मग,घाबरता कशाला? तुम्हाला ज्ञान आहे.तुम्हाला चीड येते.तुम्ही त्रस्त आहात. तरीही तुम्ही दुःख व्यक्त करु शकत नाहीत.तर त्याचे निवारण कसे होईल? कोण करील? कोणी आकाशातून देव,देवदूत किंवा ईश्वर नाही येणार.राम, कृष्ण त्यांच्या कामात व्यस्त आहेत.म्हणून आपणच,आपण म्हणजे जळगाव ची माणसे,यापैकीच ज्ञानी,साहसी माणसे ,या समस्यांचे निवारण करू.जळगांव मधील समस्या दैवी नाही.ती मानवी आहे.ती सामाजिक आहे.ती राजकीय आहे.ती मानसिक आहे.म्हणून आपण मानवच तिचे निराकरण करू शकतो.या मानवी समस्या सोडवण्यासाठी देव , देवदूत किंवा ईश्वर येत नाहीत.ते म्हणतात,तू हिंमत कर,तू तयारी कर,तू प्रयत्न कर.मी आहेच मदतीला.पण तू लपून राहाशिल आणि मी तुला मदत करू ? शक्य नाही.तू स्वतः काहीच करीत नसेल तर तुला या समस्यांच्या स्थळापासून वेगळे करीन.बाळ घाबरले तर बाप हेच करतो.बेटा,तू घाबरतोस का ?मी तुला घरी नेतो.तसे देवाने,देवदुताने, ईश्वराने परत न्यावे ,असे वाटते का?तर मग,तो मार्ग सोपा आहे.तुला हि आणि देवाला ही.देव म्हणेल,माझे मानव बाळ दानवाला घाबरले.मी नेतो त्याला घरी.
    मी या पृथ्वीतलावरील सामान्य माणूस आहे.जिवन जगण्यासाठी जन्माला आलो आहे.मला ईश्वराने सांगितले कि,जा समर्थपणे जगून घे.घाबरलास तर मला सांग.मी येतो तुला न्यायला किंवा पाठवतो देवदूत किंवा यमराज.जर घाबरलास तर तू जगण्याच्या लायकीचा नाही म्हणून पुन्हा जन्माला ही घालणार नाही.पडून राहा येथेच, माझ्या कबाडखान्यात.
      अशा धनासक्त आणि भयग्रस्त लोकांना मी शुभेच्छा देत आहे.हिंमत देत आहे.उठ!ताठ मान करून जगणे शिक.कोणी मारायच्या आधी मरू नकोस.मारले तरी सांग,मी पुन्हा जन्माला येईन, जगण्यासाठी. लढायच्या आधी हारू नकोस.हारला तरी सांग,पौरव राजासारखेच,मी राजा आहे,मला राजासारखे जगायचे आहे.
     असे जगण्यासाठी शुभेच्छा देत आहे.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post