नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराज पळाले नाहीत, ते तर रामकथेला…; ‘अनिस’च्या आरोपानंतर स्पष्टीकरण


नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नागपुरात ११ जानेवारीपर्यंतच कार्यक्रम असल्याची माहिती समाज माध्यमांवर आधीच आयोजकांनी दिली होती. महाराजांचा १७ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत रायपूरला कथेचा कार्यक्रम आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते चंदन गोस्वामी यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

महाराज नागपूरहून पळाले, असा आरोप काहींनी केला होता. असा आरोप करून भक्तांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे. बागेश्वर धाम कमिटीने कार्यक्रमाचे दोन दिवस कमी करण्याची तीन कारणे आहेत. त्यापैकी एक महाराजांचे ज्येष्ठ गुरू श्री रामभद्राचार्यजी यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस महाराज अनेक वर्षांपासून गुरूंसोबतच साजरा करतात. दुसरे कारण गधा धामजवळ आशियातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल बांधण्याबाबत बैठक, तिसरे कारण इतर ठिकाणी कथा आयोजित करून तेथील भाविकांना कथेचा लाभ देणे हे आहे. त्यासाठीच नागपुरातील कार्यक्रमाचे दोन दिवस कमी करून त्याची पूर्वकल्पना समाज माध्यमांवर दिली गेली होती, असेही या पत्रकात नमूद आहे.

रायपूरला जा, महाराज उत्तर देतील!
महाराजांचा १७ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत रायपूरला कथेचा कार्यक्रम आहे. कुणाला महाराजांबाबत काही तक्रार असल्यास ते येथे त्यांना प्रश्न विचारू शकतात. ते येथे तक्रारीला उत्तर देतील यासाठी आयोजन समिती प्रयत्न करणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईबाबत विधी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post