न्यायालयात पत्नीचा गोळ्या घालून खून








शिरूर, ता. ७ : कौटुंबिक वाद न्यायालयात नेला व पोटगीसाठी दावा दाखल केल्याच्या रागातून माजी सैनिकाने मंगळवारी (ता. ७) भरदिवसा पत्नीसह तिच्या आईवर पिस्तुलातून गोळीबार केला. यात तीन गोळ्या लागल्याने पत्नी जागीच ठार झाली; तर तिची आई गंभीर जखमी झाली. शिरूर न्यायालयाच्या आवारात दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर हल्लेखोरावर जमावाने दगडफेक केली, मात्र पिस्तुलाचा धाक दाखवीत तो पळून गेला. मात्र, काही वेळातच पोलिसांनी नाकेबंदी करून त्याला त्याच्या भावासह पकडले. मंजुळा दीपक ढवळे (वय ३२, सध्या रा. शिरूर) यांचा गोळीबारात मृत्यू झाला; तर त्यांची आई तुळसाबाई रंगनाथ झांबरे (वय ६०, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दीपक पांडुरंग ढवळे (वय ४२, सध्या रा. खुंटवली, अंबरनाथ, ठाणे, मूळ रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या हल्लेखोरासह त्याचा भाऊ संदीप पांडुरंग ढवळे या दोघांना पोलिसांनी घटनेनंतर अर्ध्या तासातच पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून परवानाप्राप्त पिस्तूल, दोन मॅगझीन, सुरा अशी हत्यारे आणि ते प्रवास करीत असलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : मृत मंजुळा यांनी कौटुंबिक कलहातून काही महिन्यापूर्वी दीपक ढवळे यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून त्या दोन मुलींसह शिरूरमधे वास्तव्यास होत्या. शिरूर मधे राहात असल्याने त्यांनी शिरूर न्यायालयात पोटगीसाठीही दावा दाखल केला होता. मंगळवारी (ता. ७) सुनावणी होऊन अंतरिम निकाल जाहीर होणार असल्याने मंजुळा या आई तुळसाबाई; तसेच आपल्या दोन मुलींसह सकाळीच शिरूर न्यायालयात आल्या होत्या. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास दीपक ढवळे हा भाऊ संदीप याच्यासह रिक्षातून आला. तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत त्याने पत्नी, मुली व सासूला न्यायालयाच्या जवळच असलेल्या पाटबंधारे खात्याच्या आवारात नेले. तेथे चर्चेचे रूपांतर बाचाबाचीत झाले आणि संतापाच्या भरात दीपक याने कंबरेला खोवलेले पिस्तूल काढून त्यातून पत्नीवर अंदाधुंद गोळीबार केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुलीला वाचवायला आलेल्या तुळसाबाई यांच्यावरही त्याने गोळीबार केला. मात्र त्यांना गोळी लागली नाही. त्यावेळी पिस्तुलाच्या उलट्या बाजूने त्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

मुलींची विनवणी वडिलांनी अव्हेरली; पण जमावाने ऐकली!

दीपक व मंजुळा यांना वैष्णवी (वय १२) व तन्वी (वय ८) या दोन मुली असून, मंजुळा या आज न्यायालयातील सुनावणीवेळी त्यांना घेऊन आल्या होत्या. सुनावणीपूर्वी दीपक ढवळेने सर्वांना चर्चेला बोलावून छोट्या मुलींदेखत त्यांच्या आईवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या मुली पित्याला असे करण्यापासून परावृत्त करीत होत्या. पप्पा, आईला मारू नका, असा आकांत त्या करीत होत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, गोळीबार करून पळून जाताना दीपक याच्यावर स्थानिकांनी दगडफेक करण्यास सुरवात केली तेव्हादेखील याच दोन मुली मधे आल्या व आमच्या पप्पांना दगड मारू नका, म्हणून जमावाला विनवत होत्या. त्यामुळेच जमाव शांत झाला व त्याचाच फायदा घेत दीपक ढवळे याने भावासह पलायन केले. आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि वडील जमावाच्या तावडीतून सुटून पळून गेलेला पाहून हतबल मुलींनी आईच्या मृतदेहाजवळ बसून ‘मम्मी, उठ उठ’ असा आक्रोश केला तेव्हा उपस्थितांनाही गहिवरून आले. लग्नाला म्हणून आला अन पत्नीचा काटा काढून गेला लष्करातून निवृत्त झालेला माजी सैनिक दीपक ढवळे याचा पत्नी मंजुळा यांच्याशी कायमच वाद होत होता. मंजुळा ही त्याच्या मामाचीच मुलगी होती. परंतु कायमच्या भांडणाला वैतागून त्या विभक्त राहात होत्या. पोटगीसाठी त्यांनी शिरूर न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर अनेकदा नोटिसा बजावूनही दीपक सुनावणीसाठी हजर राहात नव्हता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी समुपदेशनानंतर मंजुळा या अंबरनाथ येथे सासरी गेल्या. मात्र, दोन - तीन दिवसांतच मारहाण झाल्याने त्यांनी पतीसह सासरच्यांविरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. यानंतर त्यांनी पतीपासून संरक्षणाची मागणी देखील केली होती. आज पोटगीच्या निकालाची अंतरिम सुनावणी असल्याने दीपक न्यायालयात आला, तेव्हा पत्नीने आज कसे काय आले, असे विचारले असता मी नात्यातील एका लग्नासाठी भावासोबत आलो असल्याचे त्याने सांगितले व तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत पत्नी, दोन लहान मुली व सासूला न्यायालयाजवळील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या आवारात नेले व तेथेच पत्नीला तीन ते चार गोळ्या घातल्या.

Post a Comment

Previous Post Next Post