ग्रामसेवकाने लाच म्हणून मागितले... चक्क 1पोता साखर अन् 4 लाख रूपये


बुलढाणा : - विवाह नोंदणीच्या वेळी जोडण्यात आलेली काही कागदपत्रे देण्यासाठी चार लाख रुपये आणि चक्क एक पोते साखर लाचेच्या स्वरूपात मागीतल्याने बुलढाना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.त्यानुसार एक लाख रुपये लाच स्वीकारतांना मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील ग्रामसेवक रामचंद्र पवार ( ५४ ) यास आज दि. १ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

या घटनेतील फिर्यादी असलेल्या गावातील एका रहिवाशाला आपल्या विवाहाची नोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक होती. त्यासाठी तो ग्रामसेवक असलेल्या रामचंद्र पवार याच्याकडे गेला असता पवार याने ४ लाख रुपयांची लाच आणि त्याचबरोबर एक साखरेचे पोते दिले तरच कागदपत्रे मिळतील असे सांगितले. तडजोडीअंती लाचेची रक्कम दोन लाख रुपयांवर आली. तक्रारदाराने सदर बाब अँटीकरप्शन ब्युरो मध्ये कळवली. आज बुधवार रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान बुलढाणा येथील चिखली रोडवर नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोर गाळा क्रमांक आठ मध्ये लाच देण्याची ठरले. लाचखोर आरोपी रामचंद्र पवार नियोजित वेळेवर पोहोचले. त्या ठिकाणी तक्रारदाराने एक लाख रुपयांची रक्कम पवार यांना सुपूर्द केली. दबा धरून बसलेल्या अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने दुसऱ्याच क्षणाला लाचखोर ग्राम विकास अधिकारी पवार याच्यावर झडप घातली. पवारला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनात तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, एपीआय शाम भांगे, पो. हॅकॉ विलास साखरे, पो.ना. मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, विनोद लोखंडे सुनील राऊत, रवींद्र दळवी, म.पो.कॉ. स्वाती वाणी, ला.प्र. वि बुलढाणा यांनी यशस्वी केली. आरोपी ग्राम विकास अधिकारी रामचंद्र पवार याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post