10 हजाराची लाच घेतल्याच्या आरोपातून तलाठी पांडेकर याची निर्दोष मुक्तता


बार्शी:- बक्षीस पत्राचे आधारे उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी दहा हजाराचे लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याच्या आरोपातून तलाठी राजेंद्र गंगाधर पांडेकर रा - जेऊर,ता - करमाळा याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी.अग्रवाल यांनी गुन्हा शाबित न झाल्याने निर्दोष मुक्तता केली.


खटल्याची पार्श्वभूमी अशी की,तक्रारदार बाळासाहेब अभिमान घरगुटे-पाटील रा:- बिटरगाव,तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांची पत्नी मंगल हिस तिच्या आईने काही जमिनी बक्षीसपत्राने दिल्या होत्या. त्या जमिनीच्या 7/12 च्या उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराने आरोपी राजेंद्र पांडेकर तलाठी बिटरगाव तालुका करमाळा यांच्याकडे संपर्क केला असता,त्यांनी नोंद करणे कामी 15,000 रुपयाचे लाचेची मागणी केली व सरते शेवटी 10,000 स्वीकारण्याचे मान्य केले व त्याशिवाय नोंद घेतली जाणार नाही हे स्पष्ट सांगितले.
त्यावर तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सापळा लावून लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी राजेंद्र पांडेकर यास रंगेहात पकडले,असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. फिर्याद अरुण रामचंद्र देवकर यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिली.



सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक पाठविले होते. खटल्यामध्ये सरकारतर्फे एकंदर 5 साक्षीदार तपासण्यात आले.



खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील अँड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात मुळात तक्रारदाराचे काम आरोपीकडे प्रलंबित नव्हते, बिटरगावच्या तलाठी पदाचा पदभार देखील नव्हता, तक्रारदार व पंच यांच्या साक्षीमध्ये तफावत आहे,त्यामुळे आरोपीने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही,असे मुद्दे मांडले ते मान्य करून न्यायधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.निखिल पाटील अँड.दत्तप्रसाद मंजरतकर यांनी तर सरकारतर्फे प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post