नकली दारू प्रकरणी पोलिस पाटलासह दोन संशयित आरोपींना अटक


मुल:- चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यातील चितेगाव येथील बनावट दारू निर्मिती कारखाना प्रकरणात एका पोलिस पाटलासह दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. शुक्रवारी (दि. ३) ही कारवाई करण्यात आली. गुरुदास खुशाबराव संग्रामे (पोलीस पाटील, वय ४६, रा. ब्रह्मपुरी) आणि उमाजी चंद्रकांत झोडे (वय ४१, रा. मिणघरी, सिंदेवाही) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५ जानेवारीला बनावट दारू कारखाना प्रकरण उघडकीस आणले. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला घटनेच्या मुळाशी जाण्याचा आदेश दिला होता. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.



राज्य उत्पादन शुल्क विभागाने पसार आरोपी पवन उर्फ गोलू वर्मा याच्या संपर्कात असलेले तयार माल वितरक उमाजी झोडे आणि बनावट दारू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवठा करणारे पोलीस पाटील गुरुदास संग्रामे यांना सिंदेवाही बस स्थानक येथून अटक केली. त्यांच्याकडून एक आयशर टेंम्पो, चारचाकी वाहन असा एकूण १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आतापर्यंत या घटनेत एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post