मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सटकली, म्हणाले, माफिया को ‍मिट्टी में देंगे...


लखनऊ : प्रयागराज येथील आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची शुक्रवारी भरदिवसा हत्या करण्यात आली. या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे राजकारण पुन्हा एकदा तापले. उमेश पाल यांच्या हत्येचे पडसाद शनिवारी यूपी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. माफिया अतिक अहमदचे नाव उघडपणे समोर आले. समाजवादी पक्षाने याला कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश म्हटले आहे, तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हत्येमध्ये सहभागी असलेल्या माफियांचा नायनाट करणार असल्याची घोषणा केली.

प्रयागराज येथील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल तसेच त्याचा सुरक्षा रक्षक संदीप निषाद यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी गोळ्या झाडल्याप्रकरणी विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षनेते अखिलेश यांदव यांच्यावर जोरदार टीका केली. गुन्हेगारांची संख्या कशामुळे वाढली? गुन्हेगार, माफियाचा पोसिंदा कोण? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. ज्याच्या विरोधात एफआयआर दाखल आहे त्याला सपाने खासदार केले, हे तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही गुन्हेगाराला खतपाणी घातले आहे. मात्र, आमचे सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही, त्यांना आम्ही मातीत मिळल्याशिवाय शांत बसणार नाही अशी ग्वाही योगी आदित्यनाथ यांनी दिली.

शनिवारी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. त्यांच्या भाषणापूर्वी आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचे पडसाद सभागृहात उमटले. माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी उमेशच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारला कटघऱ्यात उभे केले. ते म्हणाले की, प्रयागराजमध्ये ज्याप्रकारे घटना घडली त्यावरून हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post