पोलखोल झाली! किरीट सोमय्यांची पीएचडी बोगस!!


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची (बोगस) डॉक्टरकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमय्यांच्या पीएचडीचे पुरावेच मुंबई विद्यापीठाकडे नसून सोमय्या यांनी दिलेले 'कागद'च विद्यापीठाने पुरावे म्हणून पुढे केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

माहिती अधिकारात विद्यापीठाचा हा अनागोंदी कारभार उजेडात आला आहे.

किरीट सोमय्या यांची पीएचडी संशयास्पद असल्याने त्यांनी ही 'डॉक्टरकी' कधी व कशी मिळवली याची माहिती सांताक्रूझ येथील किरण फाटक यांनी विद्यापीठाकडे 24 जानेवारी 2023 रोजी मागितली होती. विद्यापीठाने 30 जानेवारी रोजी फाटक यांना पत्र पाठवून जी माहिती दिली ती दिशाभूल करणारी आहे. कारण किरीट सोमय्या यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी विद्यापीठाकडे जी माहिती पाठवली होती तीच माहिती विद्यापीठाने फाटक यांना 'फॉरवर्ड' केली आहे.

युवासेनेची राज्यपालांकडे तक्रार

विद्यापीठाच्या 'बोगस' कारभाराची तक्रार युवासेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहिले असून त्यात ते म्हणतात, विद्यापीठाच्या किमान तीन विभागांत ही माहिती असणे आवश्यक असताना प्रशासनाने पदवीधारकाकडून दस्तावेज मागवणे म्हणजे गुन्हेगाराकडून पुरावा मागण्यासारखे आहे. मागणीतील मुख्य दस्तावेज प्रबंधचे 1170 पाने सॉफ्टकॉपीद्वारे (वास्ताविक 2005 मध्ये याची सुतराम शक्यता नव्हती) देण्यात आली आहेत. शिवाय इतर दस्तावेजदेखील विद्यापीठात नसणे हे संशयास्पद असून त्यामुळे सोमय्या यांची डॉक्टरेटच बनावट असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याचे पत्रात म्हटले आहे. विद्यापीठाचे कुलपती या नात्याने या प्रकारची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.

विद्यापीठाचाच कारभार बोगस

सोमय्यांची पीएचडी बोगस असल्याचा संशय असतानाच या पत्रोपत्रीमुळे मुंबई विद्यापीठाचाच कारभार बोगस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. किरण फाटक यांना पाठवलेल्या पत्रावर वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. संगीता पवार यांची स्वाक्षरी असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post