वार्डाच्या विकासाठी आमदार- खासदार प्रमाणे ग्रामपंचायत सदस्याला पण वार्ड निधी द्या : ग्रामपंचायत सदस्य प्रितम रामटेके यांची मागणी


                     ग्रामपंचायत सदस्यांकडून त्या वार्डाच्या विकासासाठी लोकांच्या खूप अपेक्षा असतात,पण ग्रामपंचायत सदस्याला वार्ड निधी अभावी वार्डाचा विकास करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते .ग्रामपंचायत सदस्य काहीच करू शकत नाही. ७०० ते ८०० लोकांचा नेतृत्व करतांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. बिन पगारी फुल अधिकारी अशी गोष्ट असल्यामुळे तो आपल्या वार्डासाठी काहीच करू शकत नाही.म्हणून शासनाने ग्रामपंचायत सदस्याला वार्ड विकासासाठी वेगळी निधी द्यावी ,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रितम रामटेके यांनी केली आहे.
                       त्रिस्तरीय पंचायचात राज व्यवस्थेतील महत्वाचा घटक म्हणजे गाव व ग्रामपंचायत."गाव हा विश्वाचा नकाशा गावावरूनी देशाची परीक्षा ।। गावची भंगता अवदशा । येईल देशा।।" वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समर्पक आणि साध्या सरळ भाषेत ग्रामगीतेत गावाचे महत्व अधोरेखित केलेले आहे. गाव हाच विश्वाचा मूळ घटक असतो कारण गावापासूनच शहर निर्माण झाले, शहरापासून राज्य निर्माण झाले, राज्यपासून देश तयार झाला आणि शेवटी विविध देश मिळून आपली पृथ्वी निर्माण झाली. त्यामुळे देशाच्या सामाजिक, आर्थिकदृष्ट्या किती महत्वाचं आहे हे स्पष्ट होते. देशाचा सर्वागीण विकास साधायचा असेल तर आधी गावे सुधारावी लागेल आणि नंतरच देश सुधारेल, आणि देश जर सुधारू शकत नसेल तर आपल्या भारताच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या, हाडाच पाणी करणाऱ्या संतांचे, समाजसुधारकांचे, क्रांतिकारकांचे, महामानवाचे दिलेले भारतासाठीचे सर्वांगीण उन्नतीचे योगदान व्यर्थ ठरेल.
         सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ग्रामपंचायत सदस्याचा वार्डातील लोकांशी जवळचा संबंध येतो.त्यामुळे जनता दररोज ग्रामपंचायत सदस्या समोर पाण्याची समस्या, नालीची समस्या, रोडची समस्या, घरकुलची समस्या, जि. प. शाळेची समस्या, अंगणवाडीची समस्या अशा अनेक समस्यांचा पाढा वाचत असतो.पण एवढ्या साऱ्या समस्या असतांना ग्रामपंचायत सदस्याकडे कडे २ रुपयांची निधी नसते. त्यामुळे त्या समस्या मार्गी लावू शकत नाही.
         त्यातल्या त्यात गावातील सरपंच थेट जनतेतून निवडला जात असल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पाहिजेल त्याप्रमाणात विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामपंचायत मध्ये असलेले महत्व नाममात्र आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या वार्डासाठी विकासनिधी देण्यात यावे,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रितम रामटेके यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post