Lok Sabha Election : 2024 मध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार, सी व्होटरच्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर



Lok Sabha Election 2024 : देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु यादरम्यानच सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता सर्वेतून पुढे आली आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार यूपीएच्या मतांमध्ये आणि जागांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने पक्षासाठी केवळ राजकीय वातावरण तयार केलं नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रीब्रँडिंगलाही मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. यासोबतच देशभरातील लोकांना जोडण्यासाठी भारत जोडो यात्रेकडे काँग्रेसची चांगली रणनीती म्हणून पाहिले जात आहे, असे या सर्वेतून दिसून आले आहे.

सर्वेक्षणानुसार 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 38 टक्के आणि यूपीएला 23 टक्के मते मिळाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या मतांची टक्केवारी वाढून 45 झाली होती. तर 27 टक्के लोकांनी यूपीएला मतदान केले होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांची तुलना केल्यास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या मताधिक्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून देखील ही बाब दिसून आली आहे. जानेवारी महिन्यात समोर आलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या निवडणुका झाल्या तर एनडीएला 43 टक्के मतं मिळतील. तर यूपीएला 30 टक्के आणि इतरांना 27 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.

काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही

भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची वक्तव्यं केली आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. परंतु, सी व्होटर आणि इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणात पीएम मोदींचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. सर्वेक्षणानुसार, 37 टक्के लोकांचे मत आहे की काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेससाठी राजकीय वातावरण तयार झाले आहे. मात्र, त्याचा काँग्रेसला निवडणूक जिंकण्यास काही फायदा होणार नाही. 29 टक्के लोक मानतात की भारत जोडो यात्रा हा जनतेशी जोडण्याचा एक उत्तम निर्णय होता. याशिवाय 13 टक्के लोकांनी भारत जोडो यात्रेला राहुल गांधींचे रीब्रँडिंग करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भारत जोडो यात्रेने काही फरक पडणार नाही, असे 9 टक्के लोकांचे मत आहे.

यूपीएच्या जागांमध्ये वाढ

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएने 59 जागा जिंकल्या होत्या. ज्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 91 जागांपर्यंत वाढल्या. त्याचवेळी या वर्षी जानेवारी महिन्यात समोर आलेल्या या सर्वेक्षणात 153 जागा यूपीएच्या खात्यात जाताना दिसत आहेत. जानेवारी 2022 मध्येही या एजन्सीच्या सर्वेक्षणात यूपीएला 127 जागा मिळाल्या होत्या. जर या आकडेवारीची तुलना केली तर हे स्पष्ट होते की आता निवडणुका घेतल्या तर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या लोकसभेच्या जागांमध्ये 62 जागांची वाढ होणार आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी 2022 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात यूपीएला 26 जागांची आघाडी मिळताना दिसत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post