चक्क नवरीने 2 लाख रु घेऊनही अधिक हुंड्यासाठी लग्न मोडलं


आपल्या देशात हुंडा प्रतिबंध कायदा अस्तित्वात असला तरी ही हुंड्याची प्रथा अद्याप देशातल्या वेगवेगळ्या भागात सुरू आहे. हुंड्यामुळे आतापर्यंत लाखो लग्नं मोडली आहेत, तर लाखो संसारदेखील उध्वस्त झाले आहेत. हुंड्यामुळे लग्न मोडण्याचं एक प्रकरण तेलंगणामधील मेडचल जिल्ह्यात घडलं आहे. परंतु हे प्रकरण थोडं वेगळं आहे. कारण हुंड्यासाठी नवरदेवांनी लग्नं मोडलेली आपण पाहिली आहेत. या प्रकरणात मात्र नवरीने अधिक हुंड्यासाठी लग्न मोडलं आहे.

एका नवरीने मुहूर्ताच्या एक तास आधी मिळालेला हुंडा पुरेसा नसल्याचं कारण पुढे करत तिचं लग्न मोडलं आहे. नवरीने यावेळी अधिक हुंड्याची मागणी केली. ही घटना हैदराबादमधील घाटकेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोचारम नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या एका कॉलोनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातल्या असवाराओपेटमधील एका तरुणीशी ठरलं होतं. दोन्ही कुटुंबांमधील थोरामोठ्यांनी हे लग्न ठरवलं होतं. यावेळी वरपक्ष मुलीला २ लाख रुपये हुंडा देईल असंदेखील ठरलं होतं. गुरुवारी संध्याकाळी ७.२१ वाजताचा मुहूर्त ठरला होता.

लग्न ठरल्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका वाटल्या. घाटकेसर येथील एका हॉलमध्ये लग्न होणार होतं. मुहूर्ताच्या आधी नवरदेव, त्याचं कुटुंब आणि नातेवाईक जमले. वरपक्षाने २ लाख रुपये इतका हुंडा वधूपक्षाच्या हवाली केला. मुहूर्ताची वेळ जवळ आल्यानंतर मुलीला बोलावण्यात आलं. परंतु मुलीने मांडवात येण्यास नकार दिला. ती म्हणाली की, “मुलाकडून मिळालेला हुंडा पुरेसा नाही.”



हुंड्याचे २ लाख रुपये परत दिले

लग्नाच्या एक तास आधी नवरीने लग्नास नकार दिला. त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी बोलावल्यानंतर नवरीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर त्यांनी नवरदेवाकडून मिळालेले दोन लाख रुपये परत केले आणि तिथून निघून गेले.

Post a Comment

Previous Post Next Post