मोहफुल वेचताना वाघाचा हल्ला , एक ठार



नागभीड : मोहफूल वेचण्यासाठी गावाजवळील जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना नागभीड येथून जवळच असलेल्या तुकूम गट नंबर ६०५ मध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अरुण महादेव रंधये (५६) असे मृताचे नाव आहे.


अरुण रंधये हे मंगळवारी सकाळी गावाशेजारी असलेल्या जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते.मोहफूल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीय आणि शेजारील नागरिकांनी जंगलात जाऊन शोधाशोध केली.



यावेळी त्यांचा मृतदेह आढळला. लगेचच वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनीताफ्यासह घटनास्थळ गाठले.

नागरिक दहशतीत

गेल्या चार महिन्यात नागभीड तालुक्यात वाघांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. १२ मार्च २०२३ रोजी नागभीडजवळील शिवटेकडीजवळ वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू death झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सध्या मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू आहे. लवकरच तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होईल. या घटनांना आळा घालण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post