काविळ कशामुळे होते? काविळीचे प्रकार कोणते आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची?



डोळ्याचा पांढरा पडदा पिवळसर दिसणं आणि लघवीचा रंग पिवळा होणं ही काविळीची काही सामान्य लक्षणं आहेत. अॅनिमिया किंवा पंडुरोगामुळे डोळे जर निस्तेज आणि पांढरे पडले असतील तर त्याला 'व्हाइट पॅचेस' असं म्हणतात.

कावीळ हा यकृताशी (लिव्हर) संबंधित आजार आहे. या आजाराची माहिती घेण्याबरोबरच इतरही लिव्हरशी संबंधित आरोग्याचे प्रश्न, त्यामागची कारणं, उपाय आणि उपचार हेही समजून घेऊ या.

यकृत हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. त्याचं कार्य काय?

अन्नामधील विषद्रव्यांपासून शरीराचं रक्षण करणं
शरीरातून विषद्रव्य दूर हटवणं
शरीरात रक्ताभिसरणासाठी आवश्यक असणारी प्रथिनं निर्माण करणं
शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी योग्य तेवढीच राखणं
क्षार आणि धातू साठवून ठेवणं
अशी अनेक कामं आपलं यकृत करत असतं.

काविळीचे प्रकार
काविळीचा आजार तीन प्रकारांनी होऊ शकतो.

रक्तपेशींची संख्या पुरेशी नसल्याने किंवा मलेरियासारख्या संसर्गामुळे रक्तपेशी प्रमाणाबाहेर नष्ट झाल्याने हा आजार होऊ शकतो. त्याला हिमोलायटिक जाँडिस (Hemolytic Jaundice)असं म्हणतात.
हिपेटायटिससारखा संसर्ग, अतिप्रमाणात मद्यपान किंवा इतर आजारांवरील औषधांमुळे (मुख्यतः टीबी किंवा क्षयरोग)लिव्हर खराब होऊ शकतं. काही आजारांमुळेही यकृताला हानी पोहोचते. या प्रकारामुळे होणाऱ्या काविळीला हिपॅटॉटॉक्सिक जाँडिस (Hepatotoxic Jaundice)म्हणतात.
पित्ताशयामध्ये खडे झाल्याने किंवा कुठल्याशा कर्करोगामुळे किंवा इन्फ्लमेशनमुळेही कावीळ होऊ शकते. त्याला ऑबस्ट्रक्टिव्ह जाँडिस (Obstructive Jaundice) म्हणतात.
काविळीची अशी वेगवेगळी कारणं असल्यामुळे त्यावरील उपचारही ती कशामुळे झाली यावर अवलंबून असतात. कुठल्याही प्रकारच्या काविळीवर अशास्त्रीय पद्धतीने एकाच पद्धतीचे उपचार झाले तर कधीकधी आजार बळावू शकतो.
लिव्हर फेल होण्याची मुख्य कारणं
लिव्हर फेल्युअर ही संज्ञा आपण अनेकदा ऐकतो. यकृत अकार्यक्षम होण्यामागची प्रमुख कारण कोणती?

अति प्रमाणात दारू
हिपेटायटिस बी संसर्ग
ठराविक औषधांचं अतिरिक्त प्रमाणात सेवन (मुख्यतः हर्बल मेडिसिन्स )
काही जणांमध्ये प्रतिकारशक्तीचे विकार
अतिरिक्त वजन किंवा स्थूलता
काही महिलांमध्ये गरोदरपणात यकृताची समस्या उद्भवू शकते. कधीकधी हा आजार जीवघेणाही ठरू शकतो (Acute liver failure of pregnancy)
इतर काही आजारामुळे यकृताला बराच काळ पुरेसा रक्तपुरवठा न होणे (आयझेमिक हिपेटायटिस)
सिरॉसिसचा अटॅक कधी येतो?
यकृत संकुचित होतं आणि कार्य करणं थांबवतं त्या वेळी सिरॉसिसचा अॅटॅक येतो.

याची लक्षणं काय?

कावीळ

आतड्यात पाणी होणं (Ascitis)पोटाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज (Varieces),रक्ताची उलटी होणं किंवा काळ्या रंगाचा मल
पंडुरोग (अॅनिमिया)
शरीरात अल्ब्युमिनच्या कमतरतेमुळे पायाला येणारी सूज आणि त्यापाठोपाठ शरीरात अतिरिक्त पाणी साठून राहणं ज्याला वॉटर रिटेन्शन म्हणतात.
शरीरावर सूज तसंच रक्तप्रवाह थांबवण्यासाठी आवश्यक असणारी ब्लड क्लॉटिंग प्रोटिन्सची कमतरता
नंतरच्या टप्प्यात प्लीहावरही सूज येते.
शरीरात विषद्रव्य साठून राहिल्याने ती मेंदूपर्यंत पोहोचली तर व्यक्ती बेशुद्ध होण्याची शक्यता असते किंवा खूप काळ निद्राधीन राहू शकते.
यकृताच्या प्रश्नामुळे पुढे रक्तदाब कमी होतो आणि इतर आजारही बळावतात.
सिरॉसिसच्या अॅटॅकनंतर लिव्हर कॅन्सर उद्भवण्याचा धोकाही असतो.
आजार ओळखायचा कसा?
डोळ्यात पिवळसर झाक दिसली, पोट दुखत असेल, सूज असेल, थोडंसं खाल्लं तरी पोट जड होत असेल, पांढरट किंवा काळपट रंगाची संडासला होत असेल, एकूणच

तुमचं पोट सलग काही दिवस बरं नसेल तर लिव्हर फंक्शन टेस्ट नावाची रक्ताची चाचणी करून घ्यायला हवी. पोटाचं स्कॅनिंग (USG abdomen)केलं तरी नेमका काय आजार आहे हे समजायला मदत होईल.

यानंतर जर गरज लागली तर संसर्ग झाला नाही ना हे तपासण्याच्या हिमोग्राम, हिपेटायटिस, पीटी (Prothrombin time)अशा टेस्ट करून घेता येतील.
पोटात पाणी झालं असल्याचं लक्षात आलं तर त्या पाण्याची लॅबमध्ये तपासणी करून आजाराचं कारण नेमकेपणाने सांगता येऊ शकतं. पोटातल्या रक्तवाहिन्यांची परिस्थिती एंडोस्कोपीतून दिसू शकते. त्यानंतर बाँडिंग करायचं का हे ठरवता येईल.

पोटाचा स्कॅन केल्यानंतर फॅटी लिव्हर आहे का दिसू शकते. अनेक जण आमच्याकडे यामुळे घाबरून येतात. पण फॅटी लिव्हर हा आपल्याकडे नेहमी दिसणारा आजार आहे. आहारात भातासारखे भरपूर कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ घेणाऱ्या आणि व्यायामाचा अभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार कॉमन आहे. मोठ्या प्रमाणात दारू पिणाऱ्या व्यक्तींनाही फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो.

यावर इलाज म्हणजे आहारातलं कार्बोहायड्रेट्स आणि तेलाचं प्रमाण कमी करायचं. दररोज व्यायाम करणं आणि मद्यपान कमी करणं आवश्यक आहे.
तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी करणं महत्त्वाचं आहे. पण आपल्या सवयी लक्षात घेता कार्बोहायड्रेट्सं प्रमाण कमी करण्यावर भर द्यायला हवा. याकडे दुर्लक्ष केलं तर प्रदीर्घ आजारात रुपांतर होऊन लिव्हर फेल्युअरची शक्यता असते.

आपल्या शरीरातल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर लक्ष ठेवायला हवं. कोलेस्ट्रॉलची चाचणी आवश्यक आहे. या रक्त तपासणीसाठी जाताना पोटात काही असता कामा नये. उपाशीपोटीच याची चाचणी करतात. LDL किंवा वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 100 च्या आतच असायला हवं.

रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्यांनी LDL कोलेस्ट्रॉलची पातळी 70 च्या आत राहील याकडे लक्ष ठेवायला हवं.

कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त असणाऱ्या व्यक्तींना काही सेकंदांत हार्ट अॅटॅक किंवा पॅरालिसिसचा अॅटॅक येण्याची शक्यता असते. याचा परिणाम आयुष्यभरासाठी राहतो.

अलिकडच्या काळात, अगदी तरुण वयातही हे आजार दिसू लागले आहेत. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. औषधोपचारांनी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. आरोग्यपूर्ण आहार आणि व्यायाम यातून ही पातळी खाली आणणं अधिक फायद्याचं ठरतं.

उपचार काय आहेत?
आजार किती गंभीर आहे आणि कशामुळे झाला आहे यावरून त्यावरच्या उपचारांची दिशा ठरते. यकृताचा जुना आजार असेल आणि तो शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असेल तर चार वर्षांपेक्षा कमी आयुष्य हातात असतं.

एखाद्या औषधामुळे किंवा प्रेग्नन्सीमुळे हा त्रास उद्धवला असेल तर ते वेळीच थांबवायला हवे.

हिपेटायटिसचा संसर्ग असल्याचं लक्षात आलं तर त्यावर उपचार घेतले पाहिेजेत.

पोट व्यवस्थित साफ होतंय ना याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, नाहीतर विषद्रव्य मेदूपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो.

पोटात मोठ्या प्रमाणावर पाणी असेल तर औषधं घेऊन ते कमी करायला हवं.
लघवीवाटे हे पोटातलं अतिरिक्त पाणी निघून जावं यासाठीदेखील औषधं आहेत. या औषधांचा परिणाम होत नसेल आणि पोटातलं पाणी तुम्हाला त्रास देत असेल तर ऑपरेशन करून ते काढून टाकावं लागतं.

तुमच्या आजाराची अवस्था लक्षात घेऊन गरज पडेल तेव्हा रक्त, रक्तवाहिन्या, अल्ब्युमिन किंवा प्लाझमा (FFP)चढवावं लागतं.

लिव्हर अगदीच काम करेनासं झालं असेल तर लिव्हर ट्रान्सप्लांटचा पर्याय असतो.

प्लिहाला सूज येऊन तिथल्या रक्तपेशी खराब होत असतील तर प्लिहा काढून टाकता येते.

तुमच्या यकृताची काळजी कशी घ्याल?
दारूच्या अतिरिक्त सेवनामुळे आजार होतात. हे लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर दारू सोडली पाहिजे.
असुरक्षित लैंगिंक संबंधांपासून दूर राहून हिपेटायटिसचा संसर्ग लांब ठेवता येईल.
फक्त स्निग्न पदार्थच नव्हे, तर कार्बोहायड्रेट्सचा आहारातला समावेशसुद्धा नियंत्रित ठेवायला हवा.
दररोज शारीरिक व्यायाम वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
दीर्घ आजार असणाऱ्या व्यक्तींनी वेळेवर तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतले पाहिजेत.
लिव्हरशी संबंधित आजार असल्याचं लक्षात आल्यानंतर तात्पुरता धोका पुढे नेणारे अशास्त्रीय उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य उपचार सुरू करावेत.
-०-

Post a Comment

Previous Post Next Post