मी फडतूस नाही काडतूस आहे...झुकेगा नही साला...मैं घुसेगा...; फडणवीसांचा उद्धव यांना इशारा


उद्धव ठाकरे काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू... अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोप सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी लक्षात ठेवा फडतूस नाही तर काडतूस आहे.. झुकेगा नही साला... मैं घुसेगा...अशी शेरेबाजीदेखील केली

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता रोशन शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री मारहाण केली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह तिची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त करत राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याची बोचरी टीका केली. ठाकरे यांच्या टीकेचे पडसाद आज उमटले. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोप सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. 

फडतूस गृहमंत्री या वक्तव्याचा ही जोरदार समाचार फडणवीसांनी या सभेत घेतला. त्यांनी म्हटले की, आज उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणाले. मात्र, लक्षात ठेवा फडतूस नाही तर काडतूस आहे...झुकेगा नही साला... मैं घुसेगा अशी शेरेबाजी ही फडणवीसांनी केली. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या फोटोला जोडे मारले होते आणि आता काँग्रेसचे नेते सावरकर बद्दल बलात्कार आणि समलैंगिकतेचे घाणेरडे आरोप करत असताना उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले होते. राहुल गांधी ने महाराष्ट्रात येऊन अपमान केले आणि दुसऱ्या दिवशी तुमचे बाळराजे ( आदित्य ) त्यांच्या सोबत गेले अशी टीका फडणवीसांनी केली. 

सावरकर यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले होते. त्यामुळे राहुल गांधी तुम्ही आमचे ऐकत नसाल तरी आपल्या आजीचे तर ऐका असा सल्ला फडणवीसांनी राहुल गांधींना दिला. तुम्ही सावरकरांचा जेवढं अपमान करणार, आम्ही देशभक्त रस्त्यावर येऊन तेवढं विरोध करू. तुम्ही आमच्या डोक्यातून सावरकर यांना मिटवू शकत नाही असे फडणवीस म्हणाले. सावरकर गौरव यात्रा तेव्हा पर्यंत चालेल, जो वर सावरकर यांचा अपमान करणारे कुजके मेंदू कायम आहेत असे ही फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीबाबतही भाष्य करताना विरोधकांवर निशाणा साधला. काही लोकं आम्हाला विचारतात सावरकर यांना भारतरत्न का देत नाही? अरे वेड्यानो सावरकर भारत रत्न आहेतच. कधीतरी तो सन्मान त्यांना दिलाच जाईल.आजवर अनेकांना भारत रत्न मिळालेले नाही. आधी सावरकर यांचा अपमान करणारे कुजके मेंदू सरळ करू.. मग सावरकर यांना भारत रत्न देऊ असे ही फडणवीस म्हणाले

Post a Comment

Previous Post Next Post