मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाला २० वर्षाची जेल



अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

 भंडारा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून पळवून नेणाऱ्या युवकाला २० वर्षांची शिक्षा झाली आहे. भंडारा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे (स्पेशल जज पोक्सो) यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

या प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव सुभाष देवनाथ भोवते (२५, कलेवाडी, ता. पवनी) असे असून २०२१ मधील हे प्रकरण आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही पळवून नेल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

२३ सप्टेंबर २०२१ रोजी एक बारावीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी घरून सायकलीने शाळेत गेल्यावर परत आली नव्हती. त्यामुळे पालकांनी शोध घेतला असता, पहेला येथे एका पानठेल्याजवळ सायकल ठेवून ती बसने अड्याळला गेल्याचे कळले. यामुळे २६ सप्टेंबर २०२१ रोजी पालकांनी अड्याळ पोलिसात तक्रार केली होती. यानंतर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी ती पोलिसांना सापडली.

अल्पवयीन असल्याची कल्पना असली तरी प्रेमसंबंधातून पळवून नेल्याची कबुली आरोपीने पोलिसांत दिली होती. यावरून अड्याळ पोलिसात कलम ३६३, ३७६ (२) (एन) भादंवि सहकलम ४, ६ पोक्सो कायदा २०१२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. न्यायालयाने पुराव्यांच्या आधारावर सुभाष याला कलम सेक्शन ६ पोक्सो कायदा २०१२ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास, ३ हजार रुपये द्रव्यदंड व न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पोक्सो कायदा अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये द्रव्यदंड तसेच न भरल्यास २ महिने साधा कारावास, तसेच कलम ३६३ मध्ये १ वर्षे सश्रम कारावास ५०० रुपये द्रव्यदंड व न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात हवालदार सुभाष रहागडांले, प्रमोद कमाने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम सांभाळले.


Post a Comment

Previous Post Next Post