तेलंगाणा(Vangepalli to Gudem) राज्याचा प्रवास होणार सुखकर



वांगेपल्ली पोचमार्गाचे होणार बांधकाम

.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

अहेरी:-तालुका मुख्यालय जवळ असलेल्या वांगेपल्ली येथील पोचमार्गाचे लवकरच बांधकाम होणार असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते 30 मे रोजी भूमिपूजन करण्यात आले आहे.त्यामुळे अहेरी वरून तेलंगाणा राज्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे.

प्राणहिता नदीवर तेलंगाणा राज्य सरकारने पुलाची उभारणी करून त्या पलीकडे रस्त्याचे बांधकाम केले आहे.मात्र,राज्य सीमेवरून अहेरीकडे येण्यासाठी पोचमार्गाचे बांधकाम न झाल्याने मागील अनेक दिवसांपासून तेलंगाणा राज्यात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.ही बाब लक्षात घेऊन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

विशेष म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात थातुरमातुर काम न करता दर्जेदार आणि टिकाऊ काम करायचे असल्यास मोरीसह बांधकाम होणे गरजेचे होते.त्यामुळे मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता होती.त्यामुळे निधीसाठी जरी विलंब झाला असला तरी आता मोरीसह बांधकाम होणार असल्याने येथील स्थानिकांनाही याचा फायदा होणार आहे.

अहेरी उपविभागातील नागरिकांचा तेलंगाणा राज्याशी रोटीबेटीचा संबंध आहे.प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यापासून या रस्त्यावर 24 तास वर्दळ बघायला मिळत आहे.मात्र,पुलापासून ते अहेरी-सुभाषग्राम रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता.मात्र,आता ही अडचण दूर होणार असून राज्यसीमा पासून अहेरी-सुभाषग्राम रस्त्याला जोडणाऱ्या वांगेपल्ली पोचमार्गाचे मोरीसह बांधकाम होणार आहे.भूमिपूजन कार्यक्रमात माजी जि प सदस्य तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम,सामाजिक कार्यकर्ते अजय नागुलवार,रस्ता कामाचे कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post