बोरीचक येथे वाघाच्या हल्ल्यात दोन बैल जखमी





 वडधा : गावालगतच्या जंगलात चरायला गेलेल्या दोन बैलांवर वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील बोरीचक येथे 30 मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारस घडली. लक्ष्मण बावणे व ईश्वर राऊत यांच्या मालकीचे हे बैल आहेत. बैलांच्या गळ्याला गंभीर जखमी झाले आहे.

बोरी येथील बावणे व राऊत यांच्या मालकीचे बैल नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून दोन्ही बैलास जखमी केले. दोन्ही बैल वाघाच्या तावडीतून कसेबसे सुटून घरी आले. तेव्हा घरमालकांनी बैलांची पाहणी केली असता त्यांच्या मानेवर व गळ्यात तसेच पोटावर जखमा दिसून आल्या. याबाबतची माहिती सिर्सीचे क्षेत्र सहायक डी.डी. उईके यांना देण्यात आली. त्यांनी पशुपालकांच्या घरी भेट देऊन पाहणी केली असता



वाघाने हल्ला केल्याचे निशाण दिसून आले. ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांचे बैल गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी याच गावातील एका व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता.

भरपाईची मागणी

■ आरमोरी तालुक्यात वाघाचा नेहमीच उपद्रव आहे. अनेक शेतकऱ्यांची गुरे वाघाच्या हल्ल्यात बळी पडले असून काही जखमी झालेली आहेत. नुकसानग्रस्त पशुपालकांना वनविभागाने तातडीने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post