होलसेल दारू विक्रेत्यांची माहिती द्या, कारवाई करू पोलिस अधीक्षकांची ग्वाही



 गडचिरोली : मुक्तिपथने होलसेल, मोठ्या दारू विक्रेत्यांची माहिती पोलिस विभागाला वेळोवेळी द्यावी, त्यानुसार नियोजनपूर्वक निश्चितच कारवाई केली जाईल. गरजेच्या ठिकाणी गावातील महत्वाच्या व्यक्तीने पंच व साक्षीदार म्हणून पुढे आले पाहिजे. तसेच निवडणुकीच्या काळात अवैध दारूसाठा आढळल्यास पीआय, एसडीपीओंना माहिती देऊन कृती केली पाहिजे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी मंगळवारी सांगितले.

स्थानिक पोलिस अधीक्षक कार्यालयात मुक्तिपथ अभियान व पोलिस विभागाच्या समन्वयातून होणाऱ्या कामाची आढावा बैठक मंगळवारी एकलव्य सभागृहामध्ये पार पडली. यावेळी ते बोलत होते.

संचालक संतोष सावळकर, दारूबंदी पथकाचे प्रमुख उल्हास भुसारी तसेच सर्व तालुक्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक आणि बाराही तालुक्यांचे मुक्तिपथचे तालुका संघटक उपस्थित होते.

दारूविक्रीची स्थिती, यश, अडचणी मुक्तिपथ चमूकडून समजून घेत गुन्हेगारीच्या विषयावर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी बैठकीत सूचना केल्या. मुक्तिपथ अभियान जिल्ह्यात कशा पद्धतीने काम करते, रचना, कार्यपद्धती, निवडक आकडेवारी, विविध समित्या, दारूमुक्त निवडसाठी मुक्तिपथ द्वारा केली जाणारी कृती आदीबाबत संतोष सावळकर यांनी नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांना  माहिती समजून सांगितली.


Post a Comment

Previous Post Next Post