शाळेच्या बाबूने घेतली 9 हजाराची लाच

भिवंडी, (वा.) प्राथमिक शाळेत केजी प्रवेशासाठी शाळेच्या फीव्यतिरिक्त नऊ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाळेतील वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक अशा दोघांना लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई करीत अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. आयेशा सिद्दीकी मुली उर्दू प्राथमिक स्कूल शाळेतील वरिष्ठ लिपिक अकिल मलिक शेख व कनिष्ठ लिपिक तहसीन मोहिद अहमद मोमीन असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पालकाच्या तक्रारीनंतर कारवाई

एका पालकाने याबाबत नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. लाच स्वीकारताना या दोघा जणांना रंगेहाथ पकडले. शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यादान करणाऱ्या शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी लाच मागण्याची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post