उत्तर प्रदेश : असदुद्दीन ओवेसींच्या सभांना प्रचंड गर्दी, पण मतं का मिळाली नाहीत?



एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काहीतरी करिष्मा करतील, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र, निकालानं या शक्यता फेटाळल्या आणि अंतिम आकडेवारी वेगळंच गणित घेऊन पुढे आली.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर MIM ला 0.49% मतं मिळाली आहेत. पण या एकूण मतांची तुलना नोटाशी केली तर नोटाला ही 0.69 टक्के इतकी मतं मिळाली आहेत, जी तुलनेनं जास्त आहेत.

MIM च्या उमेदवारांना पाच हजार मतांचा आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे जर अंदाज लावायचा झालाच तर उत्तर प्रदेशमधील मुस्लिम लोकांनीही MIM नाकारल्याचंच दिसतं.

MIM ने उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या रिंगणात एकूण 100 उमेदवार उतरवले होते. दलित मुस्लिम असं समीकरण तयार करून आपण यातल्या काही जागांवर तरी निवडूनच येऊ, अशी अटकळ त्यांनी बांधली असावी. मात्र निकाल बघून त्यांचा हा प्रयत्न पुरता फसला असल्याचंच दिसलं. हेच जर 2020 ची बिहारची निवडणूक पाहिली, तर त्या निवडणुकीत MIMने मोठ्या प्रमाणावर आपलं उपद्रवमूल्य निर्माण केलं होतं.

बिहारच्या सीमांचल भागातील 24 जागांपैकी 5 जागा MIM च्या उमेदवारांनी पटकावल्या होत्या. त्यांच्या याच विजयामुळे उत्तर प्रदेश-बिहारसारख्या हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण असणाऱ्या राज्यात ते नवं नेतृत्व म्हणून उदयाला येतील, अशा शक्यता निर्माण झाल्या होत्या. बिहारनंतर जेव्हा पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्या तेव्हाही MIM आणि ओवेसी चर्चेत होते. मात्र, चर्चेत राहूनही त्यांना पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असा परिणाम साधता आला नाही.

आता उत्तर प्रदेशच्या निकालांवर ओवेसी म्हणतात, "उत्तर प्रदेशच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे आणि आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो. MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्याप्रकारे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी मेहनत घेतली. त्यांचे ही मी आभार मानतो. तसेच ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतं दिली, त्यांचेही मी आभार मानतो. या निवडणुकीचे जे काही निकाल आले आहेत, ते आमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत, मात्र यापुढेही आम्ही प्रयत्न करीत राहू."

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने विजय मिळवल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र ओवेसींवर टीकेची तोफ डागली. राऊत म्हणतात, "भाजपच्या विजयात खरी भूमिका तर मायावती आणि ओवेसींनी निभावली आहे. यासाठी त्यांचा पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे."हेच बिहारचे MIM चे आमदार अख्तरूल ईमान ट्वीट करतात की, "आम्ही एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आम्ही समाजातील वंचित आणि अल्पसंख्याक वर्गासाठी काम करतचं राहू."

MIM ने ज्या पद्धतीने उत्तरप्रदेशात निवडणुका लढवल्या त्याबद्दल ट्विटरवर ही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. काहींनी MIM च्या भूमिकेवर टिंगलटवाळी केली तर काहींनी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी पाठिंबा दिला.

अभिनेता आणि ट्रेंड अॅनालिस्ट कमाल आर खान यानेही उत्तरप्रदेशातील भाजपच्या विजयावर खोचक असं ट्वीट केलं. तो लिहितो, "मी सर्व भारतीय मुस्लिमांना पुन्हा एकदा हेच सांगू इच्छितो की, ओवेसी भाजपचा एजंट आहे. तो भाजपच्या पेरोलवर आहे. त्यामुळे त्याच्या नादात वेडे होऊ नका." ट्विटरवर तारीक खान नावाचा एक युजर लिहितो, "असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तरप्रदेशमधील मुस्लिमांना राजकीयदृष्ट्या संघटित केल्याबद्दल त्यांच अभिनंदन. अनेक मुस्लिम लोक ओवेसी यांच्या पाठीशी उभे राहिले, पण भाजपच्या विजयाच्या भीतीने त्यांनी सपाला मतदान केल. त्यांचा कल हा ओवेसी आणि अन्य अल्पसंख्याक राजकीय संघटनांकडे आहे." तेच नरेन मुखर्जी नावाचा एक युजर लिहितो, "असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM ला 0.49 टक्के मते मिळाली आहेत. अगदी NOTA लाही त्यांच्यापेक्षा 0.69 टक्के जास्त मते मिळाली. एवढ्या सभा घेऊन ही 100 पैकी 99 उमेदवारांचे अर्ज बादच झाले. हे झालं ट्विटरचं...पण MIM च्या सभांना गर्दी असूनही त्यांना मतं का मिळाली नाहीत?

यावर उर्दू दैनिक जदीद खबरचे संपादक मासूम मुरदाबादी सांगतात, "ओवेसींच्या रॅलींना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती कारण त्यांच्याविषयी लोकांना वाटणारी सहानुभूती. या सभा आणि रॅलींमध्ये ओवेसींनी धर्मसंसद असो वा द्वेषयुक्त वक्तव्य यासर्व मुद्द्यांना हात घातला. कोणत्याच सेक्युलर असणाऱ्या पक्षांनी या मुद्द्यांना हात घातला नाही. किंबहुना अखिलेश यादवांनी सुद्धा असे मुद्दे जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. तर मायावती सुद्धा या विषयावर काही बोलल्या नाहीत.

मागच्या पाच वर्षात उत्तर प्रदेशमध्ये जे काही घडलं आहे त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहेत. मात्र हा कोणाच्याच प्रचाराचा मुद्दा नव्हता. फक्त ओवेसी यावर बोलले. ओवेसींनी मुस्लिमांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला. यामुळे सभांना तर गर्दी झाली. मात्र मतदार जेव्हा बुथवर गेले तेव्हा त्यांनी जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार पाहिला आणि आपलं मत दिलं." मुरादाबादी पुढं असं ही सांगतात की, "MIM ला उत्तर प्रदेशमध्ये संघटनात्मक बांधणी अजून घट्ट करण्याची गरज आहे. आणि ही बांधणी लगेचच शक्य नाही. संघटना मजबूत करायला वर्षानुवर्षे लागतात. आणि ओवेसींकडे त्याचीच कमतरता आहे. आणि याचमुळे ते आपल्या मतदारांना आश्वस्त करायला कमी पडले.

उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील वरिष्ठ पत्रकार शादाब रिझवी यांच्या मते, उत्तर प्रदेशमधील मुस्लिम लोक आपल्या सुरक्षेसाठी चिंतेत होते. आणि त्यांना एक मजबूत पर्याय हवा होता, जो त्यांना MIM मध्ये दिसला नाही, समाजवादी पक्षामध्ये दिसला.

रिझवी सांगतात, "आता या गोष्टींना निव्वळ अफवा मानायच्या की खर मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण उत्तर प्रदेशातले मुस्लिम ओवेसींच्या नेतृत्वावर आश्वस्त नव्हते. त्यांना असं वाटत होतं की भाजपला फायदा मिळावा या उद्देशानेच MIM या निवडणुकीत उतरले आहेत.

रिझवी पुढे असं ही सांगतात की, "ओवेसी ज्या मुस्लीम नेतृत्वाबद्दल बोलत होते, ते या निवडणुकीत समोर आलंच नाही. त्यामुळे आताच्या निकालांवरून तरी स्पष्ट दिसतं आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून मोठा चमत्कार घडवण्याची शक्यता कमी आहे"

आता उत्तर प्रदेशमधल्या निकालांवर जर एकवार नजर फिरवली तर भविष्यात मुस्लीम मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे असेल?

या प्रश्नाचं उत्तर देताना रिझवी म्हणतात, "उत्तरप्रदेशच्या राजकारणात मुस्लिमांनी याआधी बसपाला साथ दिली होती. मात्र आता पक्षाची वाताहत झालेली दिसते. यावेळी तर मुस्लिमांनी समाजवादी पक्षाला साथ दिली आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचा करिष्मा दिसेल अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळे मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपचीच असेल."
-०-

Post a Comment

Previous Post Next Post