‘भ्रष्टाचाराच्या तक्रारीसाठी मला थेट कॉल करा

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्याची घोषणा केली. या हेल्पलाइनवरचा क्रमांक आपला खासगी दूरध्वनी क्रमांक असून कोणी लाच मागितल्यास त्या संदर्भातला व्हीडिओ व ऑडिओ या क्रमांकावर पाठवावा असे आवाहन मान यांनी पंजाबच्या जनतेला केले आहे. पंजाबमधील आपच्या सरकारची ही भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन २३ मार्चला शहीद भगत सिंग यांच्या जयंतीच्या दिवशी सुरू होत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ही पंजाबच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना असेल असेही मान म्हणाले.

मान म्हणाले, अशी हेल्पलाइन सुरू करून मी कोणाही सरकारी अधिकाऱ्याला धमकी देत नाही, कारण ९९ टक्के सरकारी कर्मचारी हे प्रामाणिक असून एक टक्का कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी व्यवस्था सडवली आहे. अशा व्यवस्थेतील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी केवळ ‘आप’च पुरेशी आहे.

मान यांनी पंजाब हे राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचाही पुनरुच्चार केला. दिल्लीमध्ये आपचे सरकार आल्यानंतर भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी ऑडिओ व व्हीडिओ पाठवावेत असे आवाहन करण्यात आले होते. या अशा प्रयत्नानंतर दिल्लीतला भ्रष्टाचार बंद झाला याची आठवण त्यांनी करून दिली.

येत्या काही दिवसांत हेल्पलाइनवरचा क्रमांक हा आपला व्यक्तिगत व्हॉट्सअप क्रमांक असेल व कोणीही पैसे, लाच मागत असेल तर त्याला नकार न देता, लाच देत असतानाचा व्हीडिओ वा ऑडिओ क्लिप संबंधित क्रमांकावर पाठवावा, त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय त्या संदर्भात कायदेशीर पावले उचलेल असे आश्वासन मान यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post