जय भिम बोलो.... फक्त 1रुपयात 1 लिटर पेट्रोल भरो...

भीम जयंतीनिमित्त सोलापूरच्या पेट्रोल पंप चालकाचा दे धक्का...

सोलापूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एका पेट्रोल पंप चालकाने एक अनोखा उपक्रम राबवला. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना या पट्ट्याने आज (१४ एप्रिल) चक्क फक्त एक रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोलची विक्री केली. सोलापुरातल्या डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापुरात पेट्रोलचा दर सध्या १२० रुपये १८ पैसे प्रति लिटर इतका आहे. या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. हा आमचा जनतेला गोड आणि सरकारला जोराचा धक्का आहे, असेही या संघटनेने म्हटले आहे. अवघ्या एक रुपयात एक लिटर पेट्रोल मिळत असल्याने या पेट्रोल पंपावर नागरिकांची तुडूंब गर्दी झाली होती. दिवसभर भली मोठी रांग यावेळी पेट्रोल पंपाच्या समोर दिसून आली. महागाईप्रचंड वाढलेली असताना आमच्यासारखी एक छोटी संघटना एक दिवस का होईना लोकांना एक रुपयात पेट्रोल देऊन दिलासा देऊ शकते तर सरकारने देखील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याची भावना डॉ. आंबेडकर स्टुडन्ट्स आणि युथ पँथर्स संघटनेचे अध्यक्ष महेश सर्वगोड यांनी यावेळी व्यक्त केली. पेट्रोलचे सरासरी दर सध्या १२० रुपये ५१ पैसे प्रति लिटरतर डिझेल १०४ रुपये ७७ पैसे प्रति लिटर आहे.

सोलापूरच्या युवकांनी राबवलेल्या या उपक्रमाची आज राज्यभर माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मोदी सरकारने यापासून काही धडे घ्यावेत आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे मत अनेकांनी सोशल माध्यमातून व्यक्त केले. या उपक्रमात प्रतिकात्मक स्वरूपात ५०० वाहनधारकांना एक रुपयात पेट्रोल देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post