धर्म आणि आडनाव ओळखपत्रातून काढून टाका, तरुणीची मागणी

सुरतच्या एका तरुणीने आपल्या ओळखपत्रामधून आपलं आडनाव आणि धर्म काढून टाकण्याची परवानगी देणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

"माझ्या नावामागे माझी जात आणि धर्माचा उल्लेख आहे, आणि या उल्लेखाची मला अडचण आहे. माझ्या नावामागे लागलेला धर्म आणि जातीची ओळख मला इतर लोकांपासून वेगळं करते. त्यामुळे आता मला धर्म आणि जातीची ओळख नकोय, लोकांनी मला एक सामान्य व्यक्ती म्हणून बघावं अशी माझी इच्छा आहे."

गुजरातमधील काजल मंजुला नावाची तरुणी जातीविषयीचं तिचं मत व्यक्त करते.

काजल मंजुला ही मूळची चोरवाड शहरातील असून सध्या ती सुरत येथील एका निवारागृहात राहते. तिच्या ओळख प्रमाणपत्रावरील तिच्या नावामागे असणारा जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती तिने गुजरात हायकोर्टाकडे केली आहे.


काजलचे वडील शिक्षक होते आणि ते जातीने ब्राह्मण होते. काजलने MSC (IT) केलंय.

'नो कास्ट, नो रिलिजन'
बीबीसीशी बोलताना काजल म्हणते, "माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, माझे आई-वडील शिक्षक होते. चोरवाडसारख्या छोट्या गावात जात आणि धर्माला खूप महत्त्व आहे. जेव्हा आम्ही इतर जातीतील लोकांमध्ये मिसळायचो तेव्हा लोक आमच्यावर टीका करायचे, परंतु माझ्या पालकांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता."

काजल लहान असतानाच तिची आई मंजुलाबाईंचे निधन झालं. काजल आणि तिच्या मोठ्या भावाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्या वडिलांवर येऊन पडली. त्यामुळे समाजाच्या दबावाखाली येऊन वडिलांनी दुसरं लग्न केलं.
काजल म्हणते, "माझ्या सावत्र आईचा जातीपातीवर विश्वास होता, त्यामुळे आमच्यात वाद निर्माण झाले. तसेच माझी सावत्र आई तिच्या मुलांमध्ये आणि आमच्यात भेदभाव करायची. मग माझ्या वडिलांनी यावर तोडगा म्हणून मला अहमदाबादला शिक्षणासाठी पाठवलं. मी अकरावीपासून अहमदाबादमध्ये शिकायला आले आणि अभ्यासासोबत कामही केलं.

"दरम्यान, आमच्या आईला आनंद वाटावा म्हणून माझ्या भावाने आम्हाला न कळवताच नोकरीसाठी अर्ज केला. आणि त्याने मी आणि माझे वडील त्याच्यावर अवलंबून असल्याचं दाखवलं, ज्याला मी आक्षेप घेतला. माझ्या आक्षेपामुळे माझ्या भावाला नोकरी मिळू शकली नाही आणि त्यामुळे आमच्या भावा बहिणीच्या नात्यात वितुष्ट आलं."

या कौटुंबिक कलहामुळे अडचणीत आल्याने तिची नोकरी तिला सुरू ठेवता आली नाही, असं काजल सांगते. मात्र, तिने अडचणीतून मार्ग काढत कसंतरी आपलं MSC (IT) पूर्ण केलं.

इतर जातीतील लोकांशी मैत्री ठेवल्याने अडचणी
काजल सांगते की, इतर जातीच्या लोकांशी मैत्री ठेवल्याने बऱ्याच लोकांनी तिच्यावर आक्षेप घेतला.

ती म्हणते, "आमच्या समाजात त्यांनी माझ्याविषयी निंदा करायला सुरुवात केली. मी ब्राह्मण असून ही मी माझ्या इतर जातीच्या मित्रांच्या टिफिनमध्ये जेवायचे. यामुळे माझ्यासोबत काम करणारे इतर ब्राह्मण जातीतील लोक मला टाळायला लागले. शेवटी मी निराश झाले. या अशा जातीभेदामुळे मला मानसिक त्रास झाला. शेवटी मी माझं घर सोडलं आणि आता सुरतमध्ये एका निवारागृहात राहते."

"पण इथे ही लोक विचारतात की तुम्ही ब्राह्मण असूनही इथे निवारागृहात राहत आहात. नोकरीसाठी अर्ज करतानाही मला विचित्र पद्धतीने वागवतात. त्यामुळे माझ्या नावामागे असणाऱ्या धर्म आणि जातीची ओळख काढून टाकण्याचा निर्णय मी घेतलाय. "

गुजरात उच्च न्यायालयातील वकील धर्मेश गुर्जर यांनी काजलची बाजू घेतली आहे. त्यांनी बीबीसीला सांगितले की, काजल "नो कास्ट नो रिलीजन" साठी न्यायालयात अर्ज करणारी गुजरातमधील पहिली महिला आहे.
ते म्हणतात, "तिची केस घेताना मी हे मान्य केलंय की जात आणि धर्माच्या नावे होणाऱ्या भेदभावामुळे बरेच लोक त्रस्त आहेत. जर ब्राह्मण महिलेने हे पाऊल उचललं आहे तर समाजात नक्कीच मोठा फरक पडेल."

ते सांगतात की मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आहे. ज्यामध्ये एका महिलेला "नो कास्ट, नो रिलीजन" अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.

सुरतमध्ये राहणाऱ्या काजल मंजुलाने तिचं आडनाव काढून तिच्या नावपुढं आईचं नाव लावलं आहे.

काजलचा विश्वास आहे की जर तिला "नो कास्ट, नो रिलीजन" प्रमाणपत्र मिळालं तर ती तिचा पासपोर्ट, तिचं आधार कार्ड इत्यादींमधून जात आणि धर्माची ओळख मिटवू शकते. आणि जेव्हा ती नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाईल, तेव्हा तिला कोणीही जातीसंबंधी प्रश्न विचारणार नाही.
-०-

Post a Comment

Previous Post Next Post