कुत्र्याला दोरीने बांधून केली बेदम मारहाण...

चंद्रपूर : उभ्या असलेल्या ऑटोमध्ये कुत्रा बसल्याने त्याला पकडून बेदम मारहाण केल्याची घटना चंद्रपुरातील पठाणपुरा परिसरात घडली. मरनासन्न अवस्थेत त्याला सोडून दिल्यानंतर प्यार फाउंडेशनच्या सदस्यांना माहिती होताच घटनास्थळी दाखल होत त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीविरुद्ध फाउंडेशनचे सदस्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी तक्रार घेतलीच नसल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून तापमानसातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकजण थंड ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मोकाट प्राण्यांचे या उन्हाळ्यात बेहाल होत आहेत.

उन्हाच्या दाहकतेतच त्यांना पाणी, चारा शोधावा लागत आहे. मोकाट प्राणी दुपारच्या वेळी सावलीच्या ठिकाणी आधार घेत असल्याचे चित्र आहे. अशीच घटना पठाणपुरा येथेही घडली. मोकाट कुत्रा थांबून असलेल्या ऑटोमध्ये जावून बसला. यामुळे संतापलेल्या एकाने कुत्र्याला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. कुत्र्याचे चुकले असले तरी बेदम मारहाण करणे चुकीचे आहे. असे करू नका, असे आवाहन प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post