आधी देवाचे पाया पडले, त्यानंतर दानपेटीचा गल्ला फोडला; चोरटे सीसीटीव्हीत कैद

नांदेड - हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील हनुमान मंदिरात चोरीची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी आधी देवाचे पाय पडले त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम आणि सोने-चांदी घेऊन पसार झाले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथे हनुमान मंदिर आहे. गावकऱ्यांचे श्रद्धा स्थान असल्याने याठिकाणी नेहमी गावकऱ्यांची गर्दी असते. मात्र रात्रीच्या वेळी कुणीही राहत नसल्याने मंदिराच्या गेटला कुलूप लावण्यात येते. दरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत चोरी केली आहे. सकाळी गावकरी दर्शनासाठी मंदिरात गेल्यावर या घटनेचा खुलासा झाला. 

मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन्ही चोर कैद झाले आहेत. यावेळी काळे कपडे घालून आलेल्या दोन चोरट्यांनी गेटचा कुलूप तोडून आधी मंदिरात प्रवेश केला. आता आल्यावर मंदिरातील हनुमानाच्या समोर डोके टेकून दोघेही पाया पडले. त्यानंतर समोरच असणाऱ्या दानपेटीचे कुलूप तोडत, उत्सव कालावधीत भाविकांनी टाकलेलं अर्धाकिलो सोने, चांदी व नगद रोकड असा सर्व ऐवज लंपास केला. चोरी करतांना दोन्ही चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 

गावातील मंदिरातच चोरट्यांनी हात साप केल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना लवकरात-लवकर शोधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर याप्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. गावातील हनुमान मंदिर गावकऱ्यांचा श्रद्धा स्थान आहे. त्यामुळे मंदिरात झालेल्या चोरीमुळे गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे हनुमान भक्तांकडून चोरांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. 

समर्थ रामदासांच्या जालना जिल्ह्यातील जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये सुद्धा हनुमानाच्या मंदिरात चोरीची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. तर यासाठी पोलिसांचे विशेष पथक या घटनेची चौकशी करत असल्याचे सुद्धा समोर आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post