ठानेगाव येथील बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह आढळला - आरमोरी येथील घटना

आरमोरी/ ठाणेगांव - आरमोरी तालुक्यातील ठाणेगांव ग्रामपंचायतीचा सदस्य किरण पुराम(३८) हा गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता. दरम्यान आज १ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गाढवी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.



आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने आरमोरी पोलिस ठाण्यात दिली होती. बेपत्ता किरण पुराम यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले आहे की, माझे पती किरण माधव पुराण हे आरमोरी येथील शक्तीनगर येथील खुशाल सपाटे यांच्या शेतावर शेतमजुरीचे काम करतात. ३० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास माझ्या रोवण्याच्या कामाची सुट्टी झाल्याने मला घरी घेऊन जाण्याकरिता आरमोरी येथे त्यांचे दुचाकी वाहनाने आले व मला घरी सोडून दिले व काहीही न सांगता पुन्हा कुठेतरी निघून गेले. त्यानंतर रात्री ९ वाजताच्या दरम्यान खुशाल सपाटे यांनी माझ्या मोबाईलवर संपर्क साधुन तो नदीकडे कुठेतरी पळाला. त्याची दुचाकी येथेच ठेवली आहे. ती घेउन जा असे सांगितले. त्यानंतर मी माझ्या मेहुण्या सोबत जाऊन दुचाकी घरी आणली व माझ्या नातेवाईकांना फोन लावून विचारपूस केली. इतरत्र शोधले असता मिळून आले नसल्याचेही पत्नीने तक्रारीत नमुद केले आहे.

घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात पोहवा एकनाथ घोडाम करीत होते. दरम्यान आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास किरण पुराम याचा मृतदेह गाढवी नदीत आढळून आला. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post