युवतीस चाकुने वार करून जखमी केल्यानंतर माथेफिरू युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

कोरची :- गावातील युवतीस चाकुने वार करून जखमी केल्यानंतर माथेफिरू युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास टेमली येथे उघडकीस आली. विक्रम ग्यानसिंग पुलकवर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे. प्राप्त माहितीनुसार विक्रम हा मार्च २०२२ मध्ये मजुरीचे काम करण्यासाठी गडचांदूर येथे गेला होता. ३० जुलै २०२२ रोजी तो गावी परत आला होता. २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण जेवण केल्यानंतर विक्रम हा कुटूंबियांना कोणतीही माहिती न देता घराबाहेर निघुन गेला होता.

काही वेळाने जगतराम करशी यांनी ग्यानसिंक पुलकवर यांचे घर गाठुन विक्रम याने करशी यांच्या पुतणीस चाकुने वार करून जखमी केले असल्याची माहिती दिली. पुलकवर यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता करशी यांची पुतणी बेशुद्धावस्थेत पडली होती. तिला लागलीच कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री विक्रम हा घरी आला नाही. कुटूंबियांनी त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. आज ३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास तो टेमली येथील कमलाबाई कलारी यांच्या वाडीतील आंब्याच्या झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Post a Comment

Previous Post Next Post