बंब यांच्याशी मोबाईलवर वाद घालणाऱ्या शिक्षकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद : शालेय शिक्षक, ग्रामसेवक, आदीसह ग्रामीण भागात नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गावातच म्हणजे मुख्यालयीच राहावे, यासाठी (Mla Prashant Bumb) आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. (Aurangabad) त्यानंतर काही शिक्षकांनी बंब यांना मोबाईलवर फोन करून संताप व्यक्त करत जाब विचारल्याच्या आॅडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या.


एका शिक्षकाच्या पत्नीने बंब यांच्याशी बोलतांना अर्वाच्य भाषा वापरली होती. अखेर या महिलेच्या विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marathwada) आमदार प्रशांत बंब यांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यालयी न राहता घरभाडे घेणाऱ्या शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यानंतर बंब यांना अनेक भागातून शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांचे फोन आले आणि त्यातून संताप व्यक्त केला.



अगदी बंब यांची लाज देखील एका शिक्षकाने फोनवरील संभाषणातून काढली. एवढ्यावरच हे फोन प्रकरण थांबलले नाही, तर एका शिक्षकाच्या पत्नीने देखील बंब यांना मोबाईलवर फोन करून 'तू काय आहेस, आम्हाला माहित आहे. तुझ्याबाबत आम्ही गुगलवर सर्च केले आहे', अशी अर्वाच्य भाषा वापरली होती.त्यानंतर आता या महिलेविरोधात शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व सुशिक्षित शासकीय कर्मचारी गावात राहिल्यास गावाला, जनतेला साक्षर करतील. शेतकरी, कामगार, महिला यांनाही योजनांचा लाभ आणि आवश्यक सहकार्य मिळेल. ग्रामीण भागात वाड्या, वस्त्यांवर शैक्षणिक क्रांती घडेल यासाठी मुख्यालयी राहण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या उद्देशाने आमदार बंब यांनी विधानसभेत हा विषय मांडला होता

शिक्षकांसह ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आदींनी नियुक्ती मिळालेल्या गावात अर्थात मुख्यालयीच राहणे गरजेचे असून अनेक शिक्षक, शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाड्याची खोटी बिले देऊन रक्कम उचलतात. शासनासह जनतेचीही ते फसवणूक करतात असा आरोप बंब यांनी केला होता. त्यानंतर काही शिक्षकांनी बंब यांना मोबाईलवर फोन करून जाब विचारला होता. एका शिक्षक पत्नीने बंब अरेतुरेची भाषा वापरली.


या प्रकरणी लासूर स्टेशनच्या सरपंच मीना पांडव यांनी या महिलेविरोधात शिल्लेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान या महिलेवर शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत.

.

Post a Comment

Previous Post Next Post