ब्रह्मपुरी येथे दहीहंडी फोडताना विद्यार्थी जखमी

ब्रम्हपुरी : खासगी शाळेत कोणते कार्यक्रम घ्यायचे. याची नियमावली शासनाने ठरवून दिली आहे. त्यानुसार शासकीय परवानगी घेऊन किंवा शासकीय निर्देशानुसार शाळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र, येथील एका खासगी शाळेत कोणतीही शासकीय परवानगी न घेता चक्क सुटीच्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला. यात दहीहंडी फोडताना खाली पडून चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हात मोडला. याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शहरातील बालाजी वॉर्डातील प्रवीण ज्ञानेश्वर शिवणकर यांची मुलगी हिमानी (९) ही अनुभूती प्रा. शा. रेणुका माता चौक ब्रह्मपुरी येथे चौथ्या वर्गात शिकत आहे. १९ ऑगस्टला शाळेला शासकीय सुटी असतानासुद्धा अनुभूती शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडीचा कार्यक्रम असल्याने सकाळी शाळेत यायला सांगितले होते. त्यामुळे हिमानी ही शाळेत गेली होती. दुपारच्या सुमारास प्रवीण शिवणकर हे घरी असताना अंदाजे १२.30 ताजता दरम्यान शाळेतील चपराशी यांनी घरी येऊन सांगितले की, हिमानी ही दहीहंडी खेळत असताना खाली पडली व तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. शिवणकर रुग्णालयात गेले असता हिमानीच्या उजव्या हाताला मार लागल्याचे दिसले.

कोणतेही प्रशिक्षण न देता दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम निष्काळजीपणे केला. मुले एकमेकांच्या अंगावर पडली. त्यामुळे झालेल्या अपघातात हिमानीच्या उजव्या हाताला जबर मार लागून दुखापत झाली आहे. मुख्याध्यापक व शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, याकरिता प्रवीण शिवणकर यांनी पोलीस ठाणे ब्रह्मपुरी येथे तोंडी रिपोर्ट दिली आहे. घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस कर्मचारी करीत आहेत.


ही बाब त्या शाळेशी संबंधित असल्याने शाळेने योग्य सुविधेसह खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळेची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी लवकरच करण्यात येईल.

- माणिक खुणे अतिरिक्त शिक्षणाधिकारी पं. ब्रह्मपुरी

Post a Comment

Previous Post Next Post