७० दारू विक्रेत्यांना हाकलले गावाच्या बाहेर.... पोलीस प्रशासनाची कारवाई

साकोली :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तब्बल ७० अवैध दारू विक्रेत्यांना १५ दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून २०, तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५० दारू विक्रेत्यांना हद्दपार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिली आहे. तालुक्यात एवढ्या मोठ्या संख्येने अवैध व्यावसायिकांना हद्दपार करण्याची पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली.

सध्या सण-उत्सवाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि अनुचित घटना टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू होती. जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी जिल्ह्याचे सूत्र हाती घेताच दारू विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. 


संपूर्ण जिल्ह्यातून अवैध दारू विक्री हद्दपार करण्यासाठी मोहीम सुरू केली. याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी साकोली तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केले. त्यावरून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी २०, तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५० अशा एकूण ७० अवैध दारू विक्री करणाऱ्यांना १५ दिवसांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारीत केली. यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, १५ दिवस कुठे राहायचे, असा प्रश्न हद्दपार केलेल्या अवैध व्यावसायिकांसमोर पडला असून, सामान्य जनतेने मात्र सुटकेच्या निश्वास सोडला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post