गुजरात दंगलीत बिल्किस बानो महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील ७ जणांची हत्या प्रकरणी ११ दोषींची सुटका करणार्‍या समितीत भाजपचे ४ सदस्य

गुजरात:- 
२००२ च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील ११ दोषींची गुजरात सरकारने नियुक्त केलेल्या एका समितीच्या शिफारशीवरून नुकतीच सुटका करण्यात आली. या समितीतील ४ सदस्य हे भाजपशीच संबंधित होते. या सदस्यांमध्ये दोन सदस्य आमदार असून दोघेजण गोध्रा दंगलीतले प्रत्यक्ष साक्षीदार होते.


द हिंदूने या संदर्भात वृत्त दिले असून समितीतील भाजप आमदारांची नावे सीके राउलजी व सुमन चौहान अशी असून भाजपचे गोध्रा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता मुरली मूलचंदानी व भाजपच्या महिला शाखेच्या कार्यकर्त्या स्नेहाबेन भाटिया असे दोघे गोध्रा दंगलीतील साक्षीदार होते. हे चारही जण गोध्रा जिल्हाधिकारी व दंडाधिकारी सुजल मायत्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे सदस्य होते. या समितीच्या शिफारशीवरून गुजरात सरकारने बिल्कीस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले.


गुजरात सरकारच्या समितीतील मूलचंदानी यांना गोध्रा ट्रेन हत्याकांडात ५९ कारसेवकांच्या मृत्यूप्रकरणात घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून न्यायालयात उभे करण्यात आले होते. मूलचंदानी यांचा कथित जबाबामागचे एक स्टिंग ऑपरेशन स्थानिक न्यूज चॅनेलने उघडकीस आणले होते.



यात गोध्रा जळीतकांडातील नितीन पाठक व रंजित जोधा पटेल या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मूळ साक्षीच्या विरुद्ध मूलचंदानी विधाने करताना आढळून आले होते. पण या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या विशेष द्रूतगती न्यायालयाने जबाबातील विसंगती पाहून त्यांचे जबाब ग्राह्य धरले नाहीत. मूलचंदानी व अन्य तथाकथित साक्षीदार हे खरे प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार म्हणता येत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट म्हटले होते.


गुजरात सरकारने नेमलेल्या या समितीत भाजपशी निगडित ४ जणांव्यतिरिक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एक सत्र न्यायाधीश व तुरुंग अधिक्षक होते. या सर्वांनी सर्वसंमतीने ११ दोषींची सुटका करावी असा रिपोर्ट सरकारला सादर केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post