सावित्रीमाईनेच महिलांना शिक्षण दिले, ब्राम्हणनिर्मित काल्पनिक सरस्वतीने नव्हे...!

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आणि आधुनिक युगाच्या दीडशे वर्षांनंतरही विद्येची देवता सरस्वतीदेवी की सावित्रीमाई आहे आपल्याला या विषयावर बोलावे लागत आहे, हीच खरी शोकांतिका आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आणि आधुनिक युगाच्या दीडशे वर्षांनंतरही विद्येची देवता सरस्वतीदेवी की सावित्रीमाई आहे आपल्याला या विषयावर बोलावे लागत आहे, हीच खरी शोकांतिका आहे. सरस्वती देवी एक काल्पनिक देवी आहे आणि सावित्रीमाई फुले यांनी या पृथ्वीतलावर जन्म घेतला आणि आपली संपूर्ण हयात त्यांनी स्त्री शिक्षण, बहुजनांचे शिक्षण, समाजातील स्त्रियांचे दुःख त्यांच्या समस्या, स्त्रियांची गुलामगिरी, उच्चवर्णीय समाजातील विधवांची स्थिती, केशवपनाची पद्धत, सतीप्रथा, समाजातील स्त्रियांचे अनेक प्रश्‍न सुटावेत यासाठी त्या काळात महिला मंडळाची स्थापना त्यांनी केली होती. केशवपनाची कुप्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.



समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी वाणी व लेखणीद्वारे केलेले प्रबोधन, त्यासाठी लिहिलेले दोन काव्यसंग्रह, अनेक विषयावर भाषणे, महात्मा फुलेंना केलेले पत्रलेखन, महात्मा फुलेंच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुक्ता साळवे, तानुबाई बिर्जे, ताराबाई शिंदे यासारख्या अनेक जागतिक कीर्तीच्या व्यक्तिमत्वाला घडवणार्‍या सावित्रीमाई आहेत. तरीही कुणाजवळ सरस्वती देवीच्या कार्याची माहिती असेल तर ती सांगावी व आमचे अज्ञान दूर करावे.



एक नैसर्गिक प्रतिभा, स्वतंत्र व्यक्तिमत्व समाजाबद्दल असणारा कळवळा या त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी समाजासाठी देशासाठी दिलेले योगदान ते आपण कसे नाकारू शकतो. हे झालं सावित्रीमाईचं थोडक्यात कार्य मग जे कोणी सरस्वतीला शिक्षणाची देवता मानतात त्यांनी सरस्वतीचा जन्म कुठे आणि केव्हा झाला सरस्वतीच्या आईचे नाव काय होते? सरस्वतीच्या वडिलांचे नाव काय होते? सरस्वतीने पहिली शाळा कधी उघडली? सरस्वतीने कोण कोणती पुस्तके लिहिली? 



शिक्षण क्षेत्रात सरस्वतीचे योगदान कोणते? सरस्वती देवीने कोणत्या लोकांना कधी शिकवले? सरस्वती देवीला कोणी विद्या दिली? जसे सावित्रीमाई अशिक्षित होत्या त्यांना त्यांचे पती महात्मा फुले यांनी शिक्षण दिले तसे सरस्वती देवीला कोणी शिकवले? सरस्वती देवीची शिक्षणक्षेत्रात भूमिका कोणती? सावित्रीमाईंनी शिक्षण क्षेत्रात एक शिक्षिका शिक्षणतज्ञ ह्या भूमिका निभावल्या तसे सरस्वती देवीने कोणत्या क्षेत्रात आपले योगदान दिले? जसे सावित्रीमाईने महिलांना शिक्षण देऊन अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचा मार्ग दाखवला. 



तसा सरस्वतीनेही दाखवला असेल तर तो मार्ग कोणता होता? सावित्रीमाई शिकल्या त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि अनेक विषयावर अनेक ठिकाणी जाऊन प्रबोधन केले. त्यासाठी त्या पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भात आल्या होत्या अशी नोंद आहे. सरस्वती देवीचे कार्य काय होते? सरस्वतीने कोणत्या वर्गाला ज्ञानदान केले? जसे सावित्रीमाईने जात वर्ण न पाहता शिक्षण दिले तसे सरस्वतीने कोणत्या जातीधर्माच्या लोकांना शिक्षित केले या विषयी माहिती द्यावी आणि आमचे अज्ञान दूर करावे.



विद्येची देवता सरस्वतीदेवी की सावित्रीमाई? शिक्षणाचा आणि सरस्वतीदेवीचा संबंध काय? सरकारी कार्यालयात शाळेत आजही सरस्वतीची प्रतिमा दिसते. शिक्षणाची द्वारे खुली केलेल्या सावित्रीमाईची प्रतिमा नाही. शासनाला जीआर काढावा लागतो की सरकारी कार्यालयात तसेच शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सावित्रीमाईचा फोटो लावावा. असा जीआर काढण्याची गरज का पडली? कारण आजही ज्या देवीमुळे आपण शिकलो त्या विद्येच्या देवतेला म्हणजे सावित्रीमाईंना समाज जातीच्या चष्म्यातून बघतो. 



सावित्रीमाईंनाचं नाही तर अनेक महानायिका-महानायक ज्यांना आज देखील जातीच्या चष्म्यातून बघितले जाते. ज्या महापुरुषांनी जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्या प्रत्येक महापुरुषाला जातीवादी लोक आजही जातीच्या चष्म्यातून बघतात. हीच खरी महापुरुषांच्या विचारांची हार आहे. महापुरुषांना जातीत बंदिस्त केल्यामुळे महापुरुषांच्या विचारांमुळे जी क्रांती झाली आणि होणार आहे. त्या क्रांतीला एक प्रकारची खीळ बसली आहे. म्हणून म्हणते शिक्षणाची देवता सरस्वती देवी की सावित्रीमाई आमचे अज्ञान दूर करावे.



राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ अखिल भारतीय समता परिषदेच्या मंचावरून म्हणाले की, ज्यांना आपण कधी पाहिले नाही. ज्यांनी आपल्यासाठी काही केले नाही. अशा काल्पनिक देवीची पूजा का करायची असा सवाल त्यांनी केला. 



पूजा करायची तर महात्मा फुलेंची करा, सावित्रीमाईंची करा, शाहू महाराजांची करा,आंबेडकरांची करा. ज्यांच्या विचारातून क्रांती झाली ज्यांच्या विचारातून गुलामगिरी नष्ट झाली आपण घडलो वाढलो त्यांच्या विचारांची पूजा करण्याला काय हरकत आहे. शिक्षणाची देवता सावित्रीमाई की सरस्वती देवी या विषयी मार्गदर्शन करावे व आमचे अज्ञान दूर करावे.



शिक्षणाची देवता सावित्रीमाई की सरस्वती देवी? महात्मा फुले यांनी बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उपाय शोधला आणि त्या दिशेने कार्य केले. मुलींसाठी पहिली शाळा काढली. हळूहळू अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. मुलींच्या पहिल्या शाळेत तीन टक्के समाजातील मुलीही शिकल्या. उच्चवर्णीय स्त्रियांही फुले सावित्रीच्या शाळेतच शिकल्या. त्याही गुलामगिरीत जीवन जगत होत्या. 



सावित्रीमाईंनी मुलींना शिकवण्याचे कार्य हाती घेतले आणि स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. ज्योती सावित्रीच्या आधी कोणीही स्त्रियांना मानवी हक्क द्यायला तयार नव्हते. शूद्र आणि स्त्रिया सारख्याच होत्या. सरस्वती देवीने कुणाला कधी शिकवले याची माहिती द्यावी. बहुजनांसाठी त्यांनी काय कार्य केले ते सांगावे. फुले-शाहू-आंबेडकऱी विचारामुळे त्यांच्या कार्यामुळे समाज घडला. 



शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असावा. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावावा, असे भुजबळ म्हणाले. यात चुकीचे काहीच नाही.



 शिक्षणाची दारे ज्यांनी उघडली. त्यांचे फोटो सरकारी कार्यालयांमध्ये असावेत ही भूमिका योग्यच आहे. शिक्षणाची खरी देवता सावित्रीमाईच आहे. कुणाच्या नाकारण्यामुळे सत्य कधीही बदलत नसते. तरी कुणाकडे अजून काही युक्तिवाद असेल तर मांडावा आणि शिक्षणाची खरी देवता सावित्रीमाई की सरस्वती हे सिद्ध करावे व आमचे अज्ञान दूर करावे.



पूजा करायची तर बाबासाहेबांची करा. ज्यांनी हिंदू कोड बिलाच्या रूपाने स्त्रियांना हक्क अधिकार मिळवून दिले. सर्वांना शिक्षण दिले. महात्मा फुलेंनी स्त्रियांना गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी मदत केली. स्त्रिया गुलामगिरीतचं जगत होत्या. विधवांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यासाठी पुढाकार घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 



केशवपनाची कुप्रथा बंद पाडण्यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. ज्यांच्यामुळे आपल्याला हक्क व अधिकार मिळाले त्यांचीच आपण पूजा करावी. आजही अनेक कार्यालयांमध्ये काल्पनिक सरस्वती देवीचा फोटो लावलेला दिसतो. विज्ञानवादी दृष्टिकोनाचा स्वीकार करत असलेल्या आपल्या देशात आजही काल्पनिक सरस्वतीची पूजा केली जाते. ज्या सावित्रीने हालअपेष्टा सहन केल्या त्या सावित्रीची महती कधी गायली जाणार आहे? संविधानिकदृष्ट्या कोणत्या एका धर्माच्या देवी-देवतांचे फोटो सरकारी कार्यालयात लावणे योग्य आहे का? 



काल्पनिक सरस्वतीच्या काल्पनिक कथा सांगून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासणार आहोत? आपल्याला आपल्या मुलांना अंधभक्त आणि रूढीवादी बनवणे यापासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले समजल्या पाहिजेत. मुलांना तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक माहिती देणे गरजेचे आहे. नाहीतर परंपरा आणि रुढी यांमध्ये परत एकदा आपला समाज गुरफटून जाईल. म्हणून म्हणते शिक्षणाची देवता सावित्रीमाई की सरस्वती देवी हे सांगावे आणि आमचे अज्ञान दूर करावे.



विद्येची देवता सरस्वती की सावित्री? स्त्री जीवनाचा युगायुगाचा अंधकार दूर करणारी युगस्त्री सावित्रीमाई. चूल आणि मुल या जोखंडातून स्त्री जातीला मुक्त करणारी सावित्रीमाई. स्त्री शूद्रांनी शिकावे यासाठी शेण, दगड, चिखलाचा मारा सहन करणारी सावित्रीमाई. जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी शिक्षण रुपी मशाल हाती देणारी सावित्रीमाई. 



अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करणारी सावित्रीमाई. मानवता हाच खरा धर्म शिकवणारी सावित्रीमाई. जातीपाती धर्मव्यवस्थेची बंधने झुगारून देणारी सावित्रीमाई. एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणारी सावित्रीमाई. स्त्री मुक्तीचा पहिला पाठ शिकविणार्‍या सावित्रीमाई. भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई. अशा पद्धतीने सावित्रीमाईचे कार्य सर्व परिचित आहे. ज्यांना कोणाला विद्येची देवता सरस्वती देवी वाटते त्यांनी त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती द्यावी व आमचे अज्ञान दूर करावे.



मनीषा अंतरकर (जाधव)

७८२२८२८७०८

Post a Comment

Previous Post Next Post