सासरच्या लोकांनी सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेवर संशय व्यक्त करीत जबरदस्तीने केला गर्भपात

लाखांदूर : सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेवर संशय व्यक्त करीत जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना तालुक्यातील चिचाळ बारव्हा येथे उघडकिला आली. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून दिघोरी मोठी पोलिसांनी पती निखिल विलास रंगारी (२७), सासरा विलास शंकर रंगारी (५५), सासू देवला विलास रंगारी (४८) हिच्यासह लीना रंगारी (३४), अक्षय खोब्रागडे (२२), मोहित शेंडे (२५), लक्ष्मण जांगळे (३८), अंकित रंगारी (३२) व साकोली येथील एक महिला व पुरुषाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिचाळ येथील निखिल रंगारी याने प्रेमविवाह केला होता. दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यानंतर पीडिता ही पतीच्या
घरी नांदण्यासाठी गेली होती. त्या दिवसांपासून सासरच्या मंडळीनी विवाहित महिलेचा नियमित छळ करण्यास सुरुवात केल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडित विवाहिता गर्भवती राहिली. निखिलसह सासू, सासरे यांना भडकवत पीडितेची गर्भधारणा अन्य संबंधातून असल्याचा आरोप करीत पीडितेच्या विरोधात त्यांना भडकाविले, असे तक्रारीत नमूद केले आहे.

अन्य जणांच्या ऐकण्यावरून पीडितेच्या पतीसह सासू-सासरे व अन्य आरोपींनी संगनमत करून साकोली येथील दोन अज्ञात व्यक्तींच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात केला. यासाठी तीला गर्भपाताची औषध देण्यात आली. औषधाच्या सेवनाने पीडितेला अस्वस्थ वाटू लागत असल्याने तिला उपचाराच्या बहान्याने साकोली येथे नेवून गर्भपात करण्यात आला.

तसेच मृत अर्भकाला जंगलात नेऊन दफनविधी केला असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तक्रारीवरून पती, सासू, सासरे यासह अन्य सातजणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दिघोरी मोठीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहेत. साकोली येथील ते पुरुष व महिला कोण याचाही शोध घेतला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post