गणपतीचे दर्शन न झाल्यामुळे मुलीने संपविले आपले जिवन...

मुंबई:- केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर ख्याती झालेल्या लालबागच्या राजा (Lalbaug Raja)च्या दानपेटीत टाकण्यात आलेले एका भावनिक पत्र (Emotional Letter) सर्वांच्याच मनाला धक्का देऊन गेले आहे. हे पत्र ज्या मुलीच्या आई-बाबांनी दानपेटी (Donation Box)त टाकले आहे, त्या मुलीने 2019 मध्ये लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत घडलेल्या प्रकारामुळे स्वतःचे जीवन संपवले. मुलीची बाप्पाच्या दर्शनाची इच्छा अधुरीच राहिली. मात्र लालबागचा राजा व्यवस्थापन मंडळाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

मुलीच्या या अधुरी इच्छेची आठवण व तिच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी तिच्या आईबाबांनी लालबागच्या राजाच्या नवसरांगेत उभे राहणाऱ्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याची विनवणी पत्रातून केली आहे. मुलीने आत्महत्येपूर्वी रेखाटलेले चित्रही पत्राच्या रुपात दानपेटीत टाकले. हे पत्र वाचून कुणाच्याही आईवडिलांच्या डोळ्यांतून अश्रू येणार, अशीच भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

सिक्युरिटीने चुकीची भाषा वापरली

मयत आर्किटेक्ट तरुणी आणि तिची आई 2019 मध्ये लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत उभे होते. सुमारे 8 तास रांगेत उभे राहून मुलीचे पाय दुखायला लागले. याबाबत ती तेथे उपस्थित सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली. मात्र सिक्युरिटी गार्डने तिला उद्धटपणे चुकीची भाषा वापरुन उत्तर दिले.

रांगेतील प्रकारामुळे मानसिक संतुलन बिघडले

या घटनेनंतर संतापलेल्या तरुणीने आईला घेऊन थेट आपले घर गाठले. मात्र यानंतर तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि यातूनच तिने सायंकाळी स्वतःचे जीवन संपवले. तत्पूर्वी तिने तिची इच्छा चित्राच्या रुपात एका कागदावर रेखाटली.

लालबागचा राजा व्यवस्थापन म्हणते…

लालबागचा राजा व्यवस्थापक मंडळाने असे कोणतेही पत्र आपल्याला मिळाले नाही असे म्हटले आहे. पत्र मिळाल्यास त्यावर आम्ही विचार करू, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

पीडित मुलीच्या आईचे पत्र जसेच्या तसे…

कोरोना संकटानंतर लालबागचा राजा येत आहे. पण त्याच्या दर्शनाची आस असलेली माझी मुलगी आज या जगात नाही. 2019 साली लागबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि मुलगी 8 तास उभे होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने तिचे पाय खूप दुखून रांगेत उभे राहणे अशक्य झाले. तेव्हा ती जवळ उभ्या असणाऱ्या सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल अशी काहीतरी चुकीची भाषा वापरुन उत्तरे दिली. ते ऐकून संतापलेल्या माझ्या मुलीने मला रांगेतून बाहेर काढून दर्शनासाठी न थांबताच पहाटेच घरी परत नवी मुंबईला आणले. तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याच दिवशी संध्याकाळी गळफास लावून स्वतःला संपवले.

वरील कोपऱ्यातील चित्र माझ्या आर्किटेक्ट मुलीची शेवटची आठवण ठरले. जे तिने नवसाच्या रांगेत बसता यावे म्हणून काढले. ते तिला राजाच्या पेटीत ठेवायचे होते. कार्यकारी मंडळ नवसाच्या पेटीतील योग्य सूचनेप्रमाणे कृती नक्की करते हा तिचा विश्वास होता. ही तिची इच्छा शेवटची ठरली. म्हणून आम्ही ते बाप्पाच्या चरणी वाहतो.


मुलीचे दुःखी आई वडिल बहिण
सोशल मीडियावर पत्र व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे पत्र आहे, या पत्रावर महिलेने नाव आणि मोबाईलनंबर देखील दिला आहे. पण महिला आणि कुणाचा नंबर प्रकाशित करता येत नाही. तसेच ही महिला जोपर्यंत माध्यमांसमोर येऊन आपली कैफीयत किंवा रांगेत खुर्च्या ठेवण्याची मुलीची इच्छा होती, असं व्यक्त करत नाही, तोपर्यंत या पत्राविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

लालबाग मंडळाच्या अध्यक्षांनी आम्हाला असं कोणतंही पत्र अजून तरी मिळालेलं नाही, असं स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्रावर दिले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post